मराठा आरक्षणासाठी सोमवारी छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी उदयनराजे यांनी लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधींना अडवून गाडलं पाहिजे अशी भूमिकाच त्यांनी मांडली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

…तर आमच्यावरही हल्ला करताना थांबणार नाहीत; संभाजीराजेंच्या भेटीनंतर उदयनराजेंचं वक्तव्य

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उदयनराजेंनी लोकप्रतिनिधींना अडवून गाडण्याची भूमिका घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं असता अजित पवारांनी सगळेच लोकप्रतिनिधी ना अशी विचारणा करत बोलणारेही लोकप्रतिनिधी असा चिमटा काढला.

उदयनराजे काय म्हणाले आहेत –

देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी राज्याबद्दल बोलत असून केंद्राला पण लागू होतं. प्रत्येक राज्याला लागू होतं असंही ते म्हणाले.

“आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

Maratha Reservation: राज्याने धाडस करावं; केंद्राचं मी बघतो – उदयनराजे भोसले

“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाडलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

“मराठा आऱक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. दम असेल तर अधिवेशन बोलवावं असं आव्हानही यावेळी त्यांनी दिलं. आधीने राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो असंही ते म्हणाले आहेत.