मराठा आरक्षणासाठी लातूरमध्ये एकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचा दावा करत नागरिकांनी शिरुर अंतपाळ तालुक्यातील सुमराठा येथे रस्तारोको केला. मृत व्यक्तीचे नाव सुनील विनायक बिराजदार असे असून  ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माझे जीवन संपवत आहे’ अशी त्याने लहिली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहिरीत शोध घेतला आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. मोड येथे उदगीर-लातूर महामार्गावर मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  आंदोलकांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.

मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन द्यावे आणि मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत लेखी निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर असतानाच लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.