करोनाकाळात पत्नीच्या कष्टांची नव्याने जाणीव-दामले

करोना संकटाच्या काळात बायकोची नव्याने ओळख झाली.

सांगली : करोना संकटाच्या काळात बायकोची नव्याने ओळख झाली. या काळात घरकाम करताना तिला काय कष्ट पडत असतात याची जाणीव झाल्याचे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

करोना संसर्गाचा धोका कमी झाल्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कराड येथे आयोजित करण्यात आले आहेत. याची माहिती देण्यासाठी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की करोनामुळे सर्व जगच थांबले होते. या दहा महिन्यांच्या काळात घरातील व्यक्तींसाठी वेळ देता आलाच पण या निमित्ताने आयुष्याच्या जोडीदाराचीही चांगली ओळख करून घेता आली. घरकाम म्हणजे काय असते याची जाणीव झाली.

घरातील स्वच्छताच नव्हे, तर स्वयंपाक शिकण्यासाठीही वेळ देता आला, भांडी घासण्याचे काम करता आलेच, पण दुधाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी किती कष्ट पडतात याची अनुभूती घेता आली.

दहा महिन्यांच्या काळात ५० ते ६० संहिता वाचल्या असून यापकी पाच ते सहा संहितेवर काम करण्याचे निश्चित केल्याचे दामले म्हणाले. राज्यात ६३ ठिकाणी नाटय़प्रयोग करता येऊ शकतात. मात्र या ठिकाणच्या नाटय़गृहाची व्यवस्था चांगली नाही. यासाठी शासनाने ‘स्थिर निधी’ ठेव स्वरूपात ठेवून स्थानिक पातळीवरील एखाद्या समितीमार्फत या नाटय़गृहांची देखभाल करणे गरजेचे आहे. असे झाले तर अनेक शहरांना, तिथल्या प्रेक्षकांना चांगल्या कार्यक्रमांचा आनंद मिळू शकेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actor prashant damle praise wife role in corona crisis zws