नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ात तेंदू कंत्राटदारांची मक्तेदारी संपुष्टात आणत भामरागड, एटापल्ली व धानोरा या तीन तालुक्यांतील ५० ग्रामसभांनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन करून तो थेट विडी कारखानदारांना विकण्याचा संकल्प पूर्णत्वास जात आहे. बांबूपाठोपाठ तेंदू संकलनातून या आदिवासी जिल्हय़ातील गावे आता स्वयंभू होण्याच्या दिशेने एकेक पाऊल पडायला सुरुवात झालेली आहे.

गडचिरोली जिल्हय़ात तेंदूपत्ता हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. वन आणि नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध अशा गडचिरोली जिल्हय़ात बांबूपाठोपाठ तेंदूपत्ता हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व मध्य प्रदेशातील तेंदू कंत्राटदार उन्हाळ्यात येथे डेरा घालून बसतात. तेंदू कंत्राटे घेतात आणि आर्थिकदृष्टय़ा गब्बर होतात. नैसर्गिक संसाधनांवर कंत्राटदार आर्थिकदृष्टय़ा समृद्ध होत असले तरी गाव आणि ग्रामस्थ अठराविसे दारिद्रय़ात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा सर्व खेळ सुरू आहे. उन्हाळ्यात १५ ते २० दिवस चालणाऱ्या या व्यवसायातून गोरगरीब मजुरांना रोजगार मिळतो आणि वर्षभराची कमाई यातून होते. एकीकडे मजूर वर्गाला त्यांच्या गरजेपुरता पैसा मिळत असला तरी कंत्राटदार मात्र या व्यवसायातून श्रीमंत होत होते. अशाच अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व २००८ अन्वये नैसर्गिक संसाधनांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाल्याने त्यांनी तेंदूपत्ता लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन दोनदा निविदा मागविल्या; परंतु ग्रामसभांच्या अटी व शर्ती जाचक असल्याचे सांगत कंत्राटदार या प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मूलत: गावांची मालकी असलेल्या तेंदूपत्त्याचा व्यवसाय आपणच केला तर, असा प्रश्न ग्रामसभांच्या काही सदस्यांना पडला. यावरून खल सुरू झाला आणि सर्व जण आपणच व्यवसाय करण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले. तेंदूपत्ता व्यवस्थापनाचा कुठलाही अनुभव नसताना आणि या व्यवसायासाठी लागणारे प्रचंड आर्थिक पाठबळ नसताना ग्रामसभांनी स्वत: तेंदूपाने संकलन करण्याचे ऐतिहासिक धाडस केले. सुरुवातीला त्यांनी काही हितचिंतक आणि अन्य ग्रामसभांकडे आर्थिक मदतीची याचना केली. त्यांनीही होकार दिला आणि पैशाची जुळवाजुळव झाली. यातूनच मजुरांची मजुरी व व्यवस्थापनावर खर्च केला जात आहे.

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
mumbai south central lok sabha constituency marathi news
आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

आर्थिक व्यवहारही ई-बँकिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत आहे. तेंदूपत्ता संकलन व साठवणुकीसाठी लागणारे चेकर, दिवाणजी, व्यवस्थापक, हमाल यांसारखे मनुष्यबळही ग्रामसभांनी निर्माण केल्यानेच मजुरांना पाने संकलनानंतर संपलेला रोजगार पुढेही मिळण्यास मदत झाली. ग्रामसभांनी कायदेशीररीत्या गठित केलेल्या गौण वनोपज प्रबंधन समित्या व काही ग्रामसभांच्या ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांना तेंदू संकलनाच्या हिशेबाची जबाबदारी देण्यात आल्याने चोरीवर नियंत्रण मिळविण्यातही यश आले. शिवाय पानांची गुणवत्ता राखण्यातही मोठी मदत झाली. संकलित केलेला तेंदूपत्ता गोदामांमध्ये सुरक्षित साठविण्यात आला असून त्याची देखभाल करण्यात येत आहे.

विडी कारखान्यांना लागणारी तेंदूपानांची गुणवत्ता राखण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने ग्रामसभांना कोटय़वधीचा नफा मिळणार आहे. यामुळे गावे कोटय़धीश होतीलच, पण नैसर्गिक संसाधनांवरील तेंदू कंत्राटदारांची मक्तेदारी संपुष्टात येईल. सध्या तरी तेंदू कंत्राटदारांची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचाच परिणाम आज ५० गावे कोटय़धीश होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये एटापल् ली तालुक्यातील गुडुपल्ली, गट्टा, उरसलगोंडी, गेदा, तडसा, हालेवारा, कसनसूर, जाराबंडी, गर्देवाडा, शेवारी, बुरगी, कानोडी, सोहगांव, दिंडोरी, भामरागड तालुक्यांतील धोडराज, लसकरलहरी, भामरागड व लाहेरी याअंतर्गत येणारी गावे तसेच धानोरा तालुक्यातील चिमरीकल, कमलापूर, पेंढरी आदींचा समावेश आहे. देशातील नामवंत विडी कारखान्याशी करार करून ग्रामसभांनी संकलित केलेल्या तेंदूपानांपासून भविष्यात स्थानिक स्तरावर विडी तयार करण्याचे नियोजन करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे ग्रामसभा आर्थिकदृष्टय़ा स्वयंभू होतील, असा विश्वास मोहगाव परिसरातील ग्रामसभांच्या तेंदूसंकलनाचे प्रवर्तक रामदास जराते यांनी व्यक्त केला. प्राथमिक स्तरावर या तीन तालुक्यांत हा प्रयोग केला जात असला तरी भविष्यात आणखी असंख्य गावे यात सहभागी होतील. त्याचा थेट फायदा गावकरी व ग्रामसभांनाच होणार आहे.

व्यवस्थापन चोखपणे

पेंढरी परिसरात मोहगाव येथे २० ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलित करून ठेवला. या केंद्रावरील तेंदू व्यवस्थापनाचे काम सोनिया भगत नावाची विज्ञान शाखेची पदवीधर युवती चोखपणे करीत आहे. आर्थिक व्यवहार, तेंदूपानांचा हिशेब, विविध ठराव, टी.पी. तयार करणे इत्यादी कामे सोनियाने व्यवस्थितरीत्या केली. तेंदूपत्ता व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या युवतीने पार पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतरच्या हंगामात अनेक युवतींचा सहभाग वाढण्यास सोनियाच्या कामगिरीमुळे मदत होणार आहे.

व्यवसायात धोके

ग्रामसभांनी या व्यवसायात ठेवलेले पाऊल स्वागतार्हच आहे, परंतु कंत्राटदार हे तेंदूपत्ता, त्याची प्रतवारी व इतरही बाबींकडे बारकाईने लक्ष देतो. मात्र ग्रामसभा तेंदू पानाची प्रतवारी, क्वालिटी याकडे लक्ष न देता केवळ आर्थिक फायद्यासाठी कसाही तेंदू गोळा करून तो विक्रीस काढेल. यात सुरुवातीला आर्थिक नफा मिळत असला तरी नंतर दर्जामुळे भाव मिळणार नाही. त्याचा परिणाम ग्रामसभांना आर्थिक फायदा आणि नुकसान दोन्ही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया तेंदू कंत्राटदार पंकज जैन यांनी व्यक्त केली.

उच्चशिक्षित विद्यार्थी व्यवसायाकडे

जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसू नोगोटी यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील आयआयटीची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील व ओंकार घाटपांडे तसेच एमबीएचा विद्यार्थी आशीष दोनाडकर यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील ग्रामसभांच्या तेंदू संकलन केंद्रावर तेंदू व्यवस्थापन, व्यवहार व त्याचा ग्रामसभा आणि लोकांना होणारा फायदा या बाबींचा अभ्यास केला. सुरुवातीला कुतूहल म्हणून तेंदू व्यवसाय बघण्यासाठी आलेले उच्च विद्यार्थी आता या व्यवसायाची व्यापकता लक्षात घेता तेंदूकडे आकर्षित होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय हायटेक होणार आहे.

ग्रामसभांमध्ये सौदे

भामरागड, एटापल्ली व धानोरा या तीन तालुक्यांत ग्रामसभांनी मोठय़ा प्रमाणात तेंदू संकलन करून पोते भरून ठेवलेले आहेत. आता विडी कारखानदारांचे व्यवस्थापक या भागात येऊन या संकलित तेंदू पानाची पाहणी करीत आहेत. तसेच ग्रामसभांना तेंदू खरेदी करण्याचा दर ठरवीत आहेत. काही ग्रामसभांचा तेंदूचा सौदा झालेला असून त्यातून कोटय़वधीची कमाई झालेली आहे.