scorecardresearch

मांसाहारी खवय्यांवर ‘कडकनाथ’ची काळी जादू!

देशातील महानगरांबरोबरच परदेशातूनही मागणी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

देशातील महानगरांबरोबरच परदेशातूनही मागणी

आजचे युग ‘मार्केटिंग’ अन् ‘ब्रँडिंग’चे आहे. हे गणित जमले की त्या वस्तूला चांगली बाजारपेठ मिळते. मांसाहार करणाऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात ‘कडकनाथ’ या नावाने प्रसिद्ध असलेली कोंबडी अशीच लोकप्रिय ठरली आहे. आदिवासींमधील भिल्ल जमातीतील नागरिकांची अनादी काळापासून जिव्हातृप्ती करणाऱ्या ‘कडकनाथ’चे भाव सध्या गगनाला तर भिडले आहेतच; पण देशातील महानगरेच नव्हे तर विदेशातून त्यांना मागणी वाढली आहे. खवय्यांकडून होणाऱ्या प्रचंड मागणीमुळे त्याचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे.

काळ्या रंगाची पिसे, चोच, जीभ, बोटे आणि एवढेच नव्हे तर ‘कडकनाथ’चे (कोंबडी) रक्त आणि मांसही काळ्या रंगाचे असते. काळा रंग तसा अशुभ, पण ‘कडकनाथ’बाबत हे लागू होत नाही. त्याची लोकप्रियता आणि औषध गुणांमुळे ‘कडकनाथ’ पालनाचा व्यवसाय तेजीत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्येही ‘कडकनाथ’ला चांगली मागणी असून, अतिशय चढय़ा दराने त्याची मांसविक्री केली जाते. आता तर परदेशातही मागणी वाढू लागली आहे. सध्या यात महिला बचतगटाने उडी घेत या व्यावसायिक संधीचे सोने केले आहे.

कडकनाथचा पूर्व इतिहासही गमतीदार आहे. नागपुरातील पशुसंवर्धन खात्याने २००७ पासून कडकनाथची पिल्ले आणि अंडी उत्पादन सुरू केले. त्याचा योग्य प्रचार आणि प्रसार झाल्याने मागणी वाढू लागली. आता खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केली जाते. सद्य:स्थितीत पुढील वर्षांच्या मार्च महिन्यापर्यंत नोंदणी झाली आहे. या कडकनाथ कोंबडीचे नशीबही इतके थोर की अवघ्या एक दिवसाचे पिल्लू ४० रुपयांना विकले जाते. दर आठवडय़ाला दीड ते दोन हजार पिल्ले विकली जातात. महिला बचतगट तसेच खासगी व्यावसायिक येथून पिल्ले विकत घेतात, असे पशुसंवर्धन खात्याच्या सहायक आयुक्त मृणालिनी साखरे यांनी सांगितले.

व्यवसायात महिलांचा सहभाग

विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील महिला बचतगटांनी कडकनाथ पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. पशुसंवर्धन खात्याकडून पिल्ले घेऊन अंडी उबवणी केंद्र सुरू केले आहेत. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, अमरावती जिल्ह्य़ांत यांचे उत्पादन होते. यवतमाळ जिल्ह्य़ातील राळेगाव आणि कळंब येथील महिला बचतगटाने या क्षेत्रात मिळवलेला नफा पाहून जिल्ह्य़ातील आणखी तीन बचतगट यात उतरले. कडकनाथची वाढ गावठी कोंबडीप्रमाणेच होते. तिची अधिकतम उंची दीड फूट आणि वजन दोन ते अडीच किलो असते. दीड वर्षांपर्यंतची कोंबडी सर्वोत्तम मानली जाते. पाच महिन्यांच्या कोंबडीचे वजन ९२० ग्रॅम होते. या कोंबडीत चरबीचे प्रमाण कमी असते. साधारणत: एक वर्षांच्या कोंबडीत सर्वाधिक औषध गुण येतात. लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्त काळसर असते.

कडकनाथची वैशिष्टय़े

मध्य प्रदेशसह राजस्थान आणि गुजरातमधील काही जिल्ह्य़ांतील बहुतांश आदिवासी आणि ग्रामीण लोक कडकनाथचे पालन करतात. ही कोंबडी पवित्र मानली जाते. दिवाळीच्या दिवशी तिचा देवीसमोर बळी दिला जातो. आदिवासी लोक कडकनाथचे रक्त जुनाट आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते. होमिओपॅथिक औषधी गुण आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारावर हे मांस गुणकारी आहे. या मांसात प्रोटिनचे प्रमाण ९१.९४ टक्के, तर कोलेस्टेरॉल अत्यल्प असते.

दरही कडक

कडकनाथच्या औषधी गुणधर्मामुळे आणि त्याच्या वाढीसाठी तुलनेने अधिक दिवस लागत असल्याने किमती वाढल्या आहेत. ढाब्यावर ४०० ते ५०० रुपये प्रति प्लेट, पंचतारांकित हॉटेलमध्ये ८०० ते १००० रुपये प्लेटप्रमाणे विक्री केली जाते. खुल्या बाजारात कोंबडी एक हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो आणि घाऊक बाजारात ७०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. विदर्भातील कडकनाथच्या उत्पादकांकडे निर्यातीचा परवाना नाही. लखनौ आणि बंगळूरु येथील काही व्यापाऱ्यांकडे तो परवाना आहे. ते व्यापारी महिला बचतगट किंवा खासगी पोल्ट्रीकडून कोंबडय़ा घेतात आणि निर्यात करतात. विदेशात चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकले जाते.

बाजारपेठ

कडकनाथची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. यू-टय़ूब, गुगल तसेच तोंडी प्रचारामुळे मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. महाराष्ट्रातही कडकनाथची प्रचंड मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पोंभूर्णा येथील कडकनाथ जम्मू, गुवाहाटी, दिल्ली, पुणे, रत्नागिरी, पंजाब, नेपाळ, लखनौ, बंगळूरु येथे पाठवला जातो. पंचतारांकित हॉटेलमध्येही त्याला मागणी आहे. बाजारात त्याचे दर हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो असे आहेत. वेकोलीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये या व्यवसायात आलेले यशवंत तायडे यांच्याकडे कडकनाथसाठी संपूर्ण भारतातून मागणी आहे. ते ६५० ते ७०० रुपये प्रतिकिलो या घाऊक दराने कडकनाथचा पुरवठा करतात. स्वीडन, फ्रान्स, दुबई तसेच इतर मुस्लीमबहुल देशांमध्ये या मांसाची मागणी आहे. तेथे चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली जाते, असे यशवंत तायडे म्हणाले.

कडकनाथ काय आहे?

मध्य प्रदेशात मोठय़ा प्रमाणात कोंबडय़ांमध्ये जैवविविधता आढळून येते. येथे काळ्या रंगाच्या मांसाची कोंबडी कडकनाथ किंवा कालामासी या नावाने प्रसिद्ध आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्य़ातील भिल आणि भिलाला आदिवासी जमात कडकनाथचे खूप पूर्वीपासून पालन करीत होते. ‘जेट ब्लॅक’, ‘गोल्डन’ रंगाची ही कोंबडी आदिवासींमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्याचे मांस उत्तम आणि चवदार आहे. मध्य प्रदेशने ‘रॉयल चिकन’ म्हणून त्याचा प्रसार केल्यानंतर लोकप्रियता वाढली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi articles on non vegetarian food and kadaknath chicken

ताज्या बातम्या