सोलापूर : मुलांना मराठीसोबत अधिक भाषांचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले आहे.
सोलापुरात सायंकाळी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गोरे हे कुचन प्रशालेच्या प्रांगणात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी मराठीसह अन्य भाषा शिकण्याबाबत मत मांडले. या प्रश्नावर राज्यात जाणीवपूर्वक राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, की मराठी राजभाषेविषयी समस्त महाराष्ट्रवासीयांना मोठी आत्मीयता आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आतापर्यंत मराठी भाषेचा सन्मान केला जात असताना राज्यात मुलांनी मराठीसह अन्य काही भाषांचे ज्ञान घेणे त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. यामागे मुलांनी मराठीसह अन्य भाषाही शिकाव्यात, हीच भावना आहे. तसेच या भाषांबाबत निर्णय घेताना शिक्षण विभागाने कुठेही हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही. मात्र, काहींनी हा भाषेचा, मुलांच्या शिक्षणाचा विषय राजकारणाचा बनवला. आपण सध्याही इंग्रजी ही परकीय भाषा शिकतच आहोत. मुलांनी हिंदीच नाहीतर अन्य प्रादेशिक भाषा शिकल्याने त्यांचे नुकसान न होता फायदाच होणार आहे. यामागे सरकारचे, नव्या शैक्षणिक धोरणातील मुद्द्यांचा विचार न करता केवळ हिंदी सक्तीची केली असे वातावरण निर्माण करत काहींनी राजकारण केले आहे. देशात भाषावाद, प्रांतवाद निर्माण करताना मराठीच्या मुद्द्यावर आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पोळी भाजून घेण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचा आरोप गोरे यांनी ठाकरे बंधूंचा थेट नामोल्लेख टाळून केला.