मुंबई- रिक्षा-टॅक्सी चालकांनंतर आता प्रवासी वाहतूक करणारे चालक-परवानाधारकांना मराठी भाषा येणे सक्तीचे करण्यात येणार आहे. यासाठी मोटर वाहन नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती आज विधान परिषदेत सरकारकडून देण्यात आली. यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान नसतानाही व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या चालकांच्या प्राधिकारपत्रावर विभागाकडून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
शासनाकडे आलेल्या मागण्यांनुसार प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. यानुसार महाराष्ट्र मोटर वाहन नियम, १९८९ मधील नियम ४,७८ आणि ८५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडून एप्रिल २०२६ मध्ये तयार करण्यात आला आहे. याबाबत आमदार किशोर गावडे, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आदींनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. याला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्त्तर दिले आहे. यानुसार प्रवासी वाहतूक करणारे चालक, परवानाधारकांना व्यावहारिक मराठी भाषा येणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता रिक्षा-टॅक्सी पाठोपाठ सर्वच व्यावसायिक वाहन चालक व त्याचा परवाना असणाऱ्यांना मराठी बोलावे लागणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचे वर्ग
राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा’ हा प्रशिक्षण उपकम राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत राबवण्यात येत आहे. हा उपकम राबवण्यासाठी प्रत्येक कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून सदर कालावधीत व्यावहारिक मराठी भाषा शिकवणी वर्ग आयोजित करण्यात येत आहेत.
