९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत थाटात व प्रचंड उत्साहात सुरुवात झाली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन केले. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जोरदार निदर्शने करण्यास सुरूवात केली होती.
अनेक नामवंत चित्रपट आणि नाटय कलाकारांनी या संमेलनाला हजेरी लावली असतानाच उद्घाटनसमारंभादरम्यान गोंधळ उडाला. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीची नेते किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सीमाबांधवांनी जोरदार निदर्शने केली. नाट्यसंमेलनाच्या पूर्वसंध्येला कर्नाटक पोलिसांकडून नाट्यसंमेलनासाठी जाचक २० अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये सीमाप्रश्नासंदर्भात कोणताही ठराव मांडता येणार नाही,अशी जाचक अट कर्नाटक पोलिसांनी घातली आहे.