Reel Star Mahesh Mote Apology Video: ‘मी रिल स्टार आहे, माझ्याकडून टोल कसा काय मागता?’, असे बोलणारा सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर महेश मोटे सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. नेहमी व्हिडीओमधून इतरांचे ‘मनोरंजन’ करणाऱ्या महेश मोटेला यावेळी मनसैनिकांनी समज दिली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मोटेला कथित समज दिली. त्यानंतर राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घालून आणि डोक्यावर चप्पल घेऊन महेश मोटे माफी मागत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उपविभागीय अध्यक्ष शुभम जगदाळे यांच्या कार्यालयातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः शुभम जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकाराची माहिती दिली. ज्यामध्ये रिल स्टार महेश मोटेच्या तोंडाला त्यांनी काळी शाई फासली. त्यानंतर महेश मोटे डोक्यावर चप्पल ठेवून रडवेल्या चेहऱ्याने मनसेची आणि राज ठाकरेंची माफी मागताना दिसतो. व्हिडीओच्या शेवटी शुभम यांच्या सूचनेप्रमाणे तो राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घालून माफी मागतो.
शुभम जगदाळे यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेशी संवाद साधत असताना सदर प्रकाराची माहिती दिली.
महेश मोटे म्हणाले की, स्वतःला रिल स्टार म्हणवणाऱ्या महेश मोटेने १५ दिवसांपूर्वी राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ते विधान इतके घाणेरडे होते की, आम्ही कॅमेऱ्यासमोर त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असूनही महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याबाबत जर तुम्ही इतके आक्षेपार्ह विधान करणार असाल तर मनसे स्टाईलने त्याचा समाचार घ्यावाच लागेल.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
'MNS style' punishment or vigilantism? Social media influencer Mahesh Mote was allegedly forced to prostrate before Raj Thackeray's photo, smeared with black ink, and made to record a tearful apology after posting a reel mocking the party chief.#Maharashtra #MNS #RajThackeray pic.twitter.com/7xti7iP9hS
— Monu Lodhi ?? (@monu_lodh) September 21, 2026
शुभम जगदाळे पुढे म्हणाले, “महेश मोटे केरळमध्ये असताना त्यांनी हे विधान केले होते. आम्ही त्यांना त्याबद्दल सांगितलेही होते. मात्र त्यांनी तिथून आम्हाला आव्हान दिले. एआयच्या मदतीने विमानाचे खोटे तिकीट दाखवून मी पुण्यात येत आहे, मला पकडून दाखवा, असे सांगून त्याने मनसैनिकांना आव्हान दिले होते. महेश मोटेचे व्हिडीओ तुम्ही जर पाहिले तर त्याचा पूर्ण कटेंट अशाचप्रकारे इतरांना खिजवणारा आहे. या माध्यमातून तो चार पैसे कमावत असतो. त्यामुळे त्याला योग्य तो प्रसाद देण्यात आला आहे.”
भविष्यात जाऊन कुणीही अशाप्रकारे राज ठाकरेंविरोधात बोलण्याची हिंमत करणार नाही. यावेळी आम्ही महेश मोटेला विनंती करून माफी मागण्यास सांगितले आहे. पण पुढच्या वेळी मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असेही शुभम जगदाळे यांनी सांगितले.
‘मनसेच्या नादाला लागू नका’ – मोटे
दरम्यान महेश मोटे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरही माफीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, “मी अनवधानाने राज ठाकरेंबद्दल चुकीचे बोललो. शुभम जगदाळे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही मी चुकीचे बोललो. रिलच्या नादात माझ्यावर आज ही वेळ आली आहे. मनसेची मी माफी मागतो. कुणाच्याही नादी लागा पण यांच्या नादी कधीही लागू नका.”
