मराठी रंगभूमीवर सध्या सतत नवनव्या नाटकांचा, त्यातील कथा-आशय, तंत्रातील बदल, नावाजलेले कलाकार यांना घेऊन केलेले प्रयोग असा ओघ सातत्याने सुरू आहे. त्यातही सणांच्या निमित्ताने अनेक नवीन नाटकांची घोषणा केली जाते. मराठी नववर्षाचा सण आणि साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने दरवर्षी न चुकता नवीन नाटक रंगभूमीवर येते तर काही नव्या नाटकांची घोषणाही होते. ही रीत यंदाच्या गुढीपाडव्यालाही नाट्यकर्मींनी चुकवलेली नाही. दोन नवीकोरी नाटकं आधीच गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून रंगभूमीवर दाखल झाली आहेत. तर हिंदी आणि मराठी मिळून पाच नवीन नाटकांची घोषणा करण्यात आली आहे. या नाटकांच्या निमित्ताने मराठी-हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये व्यग्र असलेले काही नावाजलेले चेहरे रंगभूमीवर परतले आहेत हीसुद्धा चाहत्यांना सुखावणारी गोष्ट ठरली आहे.

२०२६ या वर्षाची सुरुवातच ‘लग्नपंचमी’ या भव्य नाटकाने झाली. प्रसिद्ध लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेले, निपुण धर्माधिकारीचे दिग्दर्शन असलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे दीर्घकाळ रुपेरी पडद्यावर रमलेले दोन नावाजलेले कलाकार रंगभूमीवर परतले. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रसिकांसमोर आलेल्या दोन नव्या नाटकांच्या निमित्तानेही असेच दीर्घकाळ चित्रपट-मालिका क्षेत्रात रमलेले मराठीतील नामांकित कलाकार रंगभूमीवर पुन्हा काम करताना दिसत आहेत. हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमधून नावारूपाला आलेला अभिनेता सुमित राघवन आणि मराठी चित्रपट-मालिकांबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमित ही जोडी बऱ्याच काळाने रंगभूमीवर एकत्र आली आहे. या दोघांच्याही ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नव्या नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. ३५ वर्षांपूर्वी एका नाटकाच्या निमित्ताने या दोघांची झालेली ओळख ते आज इतक्या वर्षांनी रंगभूमीवर एकत्र नाटक असा एकत्रित प्रवास अनुभवणाऱ्या या जोडप्याचा नवीन नाट्यप्रयोग ही अर्थातच त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली आहे. ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या नाटकाचे लेखन ओंकार गोखले याचे आहे, तर दिग्दर्शन सूरज पारसनीस याने केले आहे. तर निर्मिती नाट्यलीला आणि अष्टविनायक यांची आहे. या जोडीबरोबरच आणखी एक प्रसिद्ध कलाकार रंगभूमीवर परतला आहे तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव.

जवळपास आठ वर्षांनंतर रंगमंचावर पुनरागमन करणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या ‘ॲनिमल’ या नव्या नाटकाचे गुढीपाडव्यापासून मुंबई आणि उपनगरात सलग प्रयोग सुरू आहेत. या नाटकाची निर्मितीही सिद्धार्थनेच केली आहे. त्याने आई-वडिलांच्या नावाने ‘ताराराम’ ही नाट्यनिर्मिती संस्था सुरू केली असून या संस्थेचं हे पहिलंवहिलं नाटक अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी लिहिलं आणि दिग्दर्शितही केलं आहे. सिद्धार्थ जाधव या नाटकात दुहेरी भूमिकेत असून एकपात्री शैलीत हे नाटक बांधण्यात आलं आहे.

या नाटकाचे सिद्धार्थ सलग प्रयोग करतो आहे, याबद्दल बोलताना, ‘सलग वेगवेगळ्या रंगमंचांवर प्रेक्षकांसमोर उभं राहणं म्हणजे प्रत्येक वेळी नवा अनुभव जगण्यासारखं आहे’, अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. रंगभूमीवर आलेल्या या दोन नव्या नाटकांबरोबरच हिंदीतील एका नव्या नाटकाच्या घोषणेनेही रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनीही ‘जाने पेहचाने अंजाने’ या नव्या हिंदी नाटकाद्वारे आपण रंगभूमीवर परतणार असल्याची घोषणा केली आहे. संगीतमय नाट्यप्रयोग असलेल्या या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन गजेंद्र अहिरेंसारख्या मराठीतील नावाजलेल्या दिग्दर्शकाचं आहे. या नाटकात अनुपम खेर यांच्याबरोबर ख्यातनाम अभिनेत्री स्वरूप संपत याही मुख्य भूमिकेत काम करणार आहेत. या नाटकासाठी कौसर मुनीर यांनी गीतलेखन केले असून अनू मलिक यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुखविंदर सिंग आणि आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत.

समाजमाध्यमांवरील सात प्रभावकांना एकत्र आणणारं नाटक रंगभूमीवर कथा-आशय आणि कलाकारांना घेऊन करण्यात येणाऱ्या या नाट्यप्रयोगांमध्ये आगामी नाटकांपैकी ‘बनवा बनवी’ हे प्रभात थिएटर्सची निर्मिती असलेलं नवीन नाटक लक्ष वेधणारं आहे. प्रभात थिएटर्सने याआधी ‘लागली पैज’ या नाटकाची निर्मिती केली होती. आता ‘बनवा बनवी’ या दुसऱ्याच नाटकात त्यांनी सध्या समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या सात प्रभावकांना एकत्र आणलं आहे. ‘बनवा बनवी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन मालिकांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या अभिनेता समीर खांडेकर याने केलं असून शंतनू रांगणेकर, ऋषभ मोरे, सुमित चव्हाण, ओंकार कदम, सोनाली गुरव, सिद्धी पोतदार आणि सुधाकर सोनावणे हे सात तरुण प्रभावक या नाटकात काम करणार आहेत. नाटकाचे नेपथ्य डॉ. सुमित पाटील करणार असून, चारुलता देशपांडे नाटकाच्या वेशभूषेची सांभाळणार आहेत.

‘आम्ही फक्त दोन मिनिटांचे कलाकार नसून पूर्ण वेळ नाटक करण्याची क्षमता आमच्यातदेखील आहे. ते सिद्ध करण्यासाठीच आम्ही सगळे जण हे नाटक करत आहोत’, अशी भावना शंतनू रांगणेकर याने व्यक्त केली. तर दिग्दर्शक समीर खांडेकर याचीही स्वत:ची यूट्यूब वाहिनी आहे, त्यामुळे समाजमाध्यमावर काम करण्याचा त्याचा अनुभव आणि या तरुण प्रभावकांची ऊर्जा या दोन्हींचा मिलाफ नाटकात पाहायला मिळणार असल्याचं समीरने स्पष्ट केलं. या नाटकाचे निर्माते ज्योती प्रमोद कठापूरकर आणि निखिल एकनाथ करंडे आहेत, तर प्रियंका हेमंत जोगी या सहनिर्मात्या असून हर्षद प्रमोद कठापूरकर हे कार्यकारी प्रमुख आहेत. शेखर दाते नाटकात सूत्रधाराची भूमिका बजावणार आहेत

अभिनेता, दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचं पुनरागमन

सध्या मराठीतील दोन वाहिन्यांच्या कार्यक्रमांची, प्रसिद्धीची धुरा सांभाळणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता सतीश राजवाडे हेही ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’ या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. सुदीप मोडक लिखित आणि नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी सात वाजता’ या नाटकात सतीश राजवाडे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर चैत्राली गुप्ते, सुदीप मोडक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर नाटकाची निर्मिती अजित भुरे यांनी केली आहे. याआधी ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात सतीश राजवाडे यांनी काम केलं होतं.

सध्या येऊ घातलेल्या या नाटकांबरोबरच विजय केंकरे दिग्दर्शित ‘कृपया आहेर आणू नये’ या नवीन नाटकाचीही घोषणा करण्यात आली आहे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि नाट्यझंकार प्रॉडक्शनने या नाटकाची निर्मिती केली आहे. संतोष पवार दिग्दर्शित ‘ए भाऊ डोकंं नको खाऊ’ हे नवीन नाटकही लवकरच रंगभूमीवर येणार आहे. चैत्राचे आगमन आणि या नव्या नाटकांची चाहूल नाट्यरसिकांना नक्कीच सुखावणारी आहे.