scorecardresearch

Premium

विश्लेषण: मराठी विद्यापीठाची स्‍थापना केव्‍हा होणार?

विद्यापीठाचे स्‍वरूप कसे असावे, याबाबत तज्‍ज्ञांची समिती सूचना करणार आहे. अद्याप ही समिती गठित झालेली नाही.

marathi vidyapeeth
मराठी विद्यापीठाची स्‍थापना केव्‍हा होणार? (प्रातिनिधिक छायाचित्र)

मोहन अटाळकर

अमरावती जिल्‍ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेची घोषणा यंदाच्‍या अर्थसंकल्‍पामध्‍ये करण्‍यात आली आणि गेल्‍या अनेक दशकांपासूनची मागणीची पूर्तता झाली. राज्‍यपाल रमेश बैस यांनीही नुकतेच महाराष्‍ट्रदिनी त्‍याचे सूतोवाच केले. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्‍हणून केंद्र सरकारच्‍या पातळीवर पाठपुरावा सुरू असतानाच मराठी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेसाठी हालचाली सुरू होणे ही बाब अभिजात भाषेच्‍या चळवळीला बळ देणारी ठरू शकेल. विद्यापीठाचे स्‍वरूप कसे असावे, याबाबत तज्‍ज्ञांची समिती सूचना करणार आहे. अद्याप ही समिती गठित झालेली नाही, त्‍यामुळे प्रत्‍यक्ष विद्यापीठाची स्‍थापना केव्‍हा होणार, याची प्रतीक्षा आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

मराठी विद्यापीठाची मागणी केव्‍हापासूनची?

मराठी विद्यापीठाची मागणी सुमारे ९० वर्षांपूर्वी करण्‍यात आली होती. नागपुरात १९३४ मध्‍ये कृ.प. खाडिलकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या १९व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात, महामहोपाध्‍याय दत्‍तो वामन पोतदार यांनी ‘महाराष्‍ट्र विद्यापीठ’ स्‍थापनेच्‍या मागणीचा ठराव केला होता, तीच मागणी पुढे ‘मराठी विद्यापीठ’ म्‍हणून विकसित झाली. मराठीचे भाषिक राज्‍य निर्माण करण्‍याच्‍या चळवळीला त्‍याने बळ मिळाले होते. डॉ. नागनाथ कोतापल्‍ले यांच्‍या अध्‍यक्षतेखालील भाषा सल्‍लागार समितीने २०१४ मध्‍ये मराठी भाषा विकासाच्‍या धोरणाचा मसुदा सरकारकडे सादर केला, त्‍यात मराठी विद्यापीठाची आवश्‍यकता नमूद केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळानेही वेळोवेळी त्‍याचा पाठपुरावा केला. महामंडळाचे माजी अध्‍यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही यासंदर्भात शासनाकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार केला.

मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथे का?

मराठी भाषेतील आद्यग्रंथ कोणता, यावर मते-मतांतरे असली, तरी ‘लीळाचरित्र’ या मराठीतील पहिल्‍या गद्य चरित्रग्रंथाला विशेष महत्त्‍व आहे. इ.स. १२७८ च्या सुमारास रचला गेलेला ‘लीळाचरित्र’ हाच आद्यग्रंथ ठरतो असे अभ्यासकांचे मत आहे. या ग्रंथाची रचना रिद्धपूरमध्‍ये करण्‍यात आली. रिद्धपूर हे महानुभाव संप्रदायाचे तीर्थस्‍थान म्‍हणून ओळखले जाते. महानुभाव पंथाचे संस्‍थापक चक्रधर स्‍वामी यांनी रिद्धपूरला मठाची स्‍थापना केली. या पंथाचे नागदेवाचार्य, म्‍हाइंभट, केशिराज व्‍यास, महदाईसा यांनी पंथाचा विचार पुढे नेला. लीळाचरित्रातून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे दर्शन घडते. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात. रिद्धपूरच्‍या स्‍थानमहात्‍म्‍यामुळे येथे मराठी विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती.

कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; एआय वापरून केलेले खोटे फोटो कसे ओळखायचे?

रिद्धपूरचे वैशिष्‍ट्य काय?

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी वास्तव्य केलेली ही भूमी आहे. १३व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चक्रधर स्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आले आणि त्यांनी या पंथाचा प्रचार केला. हा पंथ भगवान कृष्ण आणि चक्रधरांची वचने प्रमाण मानतो. चक्रधर स्वामींनी रिद्धपुरात राहून मराठी भाषेत भारतीय तत्त्वज्ञान, श्रीमद्भागवत गीता, सनातन धर्म चिकित्सा यांसह अनेक विषयांवर आधारित विपुल ग्रंथांची रचना केली. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले. आद्य कवयित्री महदाईसा यांनी येथे धवळे रचले. शिशूपाल वध, रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचानाही येथेच रचल्या. त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहिले गेल्याने या भूमीला विशेष महत्त्व आहे.

मराठी विद्यापीठाचे स्‍वरूप कसे ठरणार?

सरकारकडे सादर केलेल्या रूपरेषेनुसार ते पारंपरिक विद्यापीठ असणार नाही. या विद्यापीठाचे उद्दिष्ट हे सर्व प्रकारचे आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संबद्ध सर्व ज्ञानशाखांमधील सर्व विद्याविषय, कला, सामाजिक शास्त्रे, मानव्य विद्याशास्त्रे, नैसर्गिक विज्ञान, अभियांत्रिकी, आयुर्विज्ञान, तंत्रविज्ञान या साऱ्याचेच सर्व स्तरावरील अध्ययन, अध्यापन, संशोधन इत्यादी मराठी माध्यमातून चालविण्याचे असेल, अशी सूचना करण्‍यात आली आहे. विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी तज्‍ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश असेल, असे सरकारतर्फे सांगण्‍यात आले आहे.

अमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने!

सद्यःस्थिती काय?

मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्‍ज्ञांची समिती नेमण्याची घोषणा होऊन सुमारे तीन महिने उलटून गेले आहेत. समिती तत्‍काळ गठित व्‍हावी, यासाठी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना स्मरणपत्र पाठवले आहे. ही समिती संस्थात्मक सहभागासह नेमली जावी, यासंदर्भात शासन निर्णय जाहीर व्‍हावा, अशीही मागणी करण्‍यात आली आहे. ही समिती स्‍थापन झाल्‍यानंतर तज्‍ज्ञांच्‍या शिफारशींवर विचार करून सरकार निर्णय घेणार आहे.

mohan.atalkar@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi university in amravati ridhhapur announcements in budget 2023 print exp pmw

Live Express Adda With MoS Rajeev Chandrasekhar

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×