Marathwada Shivsena Split Impact: ५२ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या आक्रसली आहे, फक्त ७१ वर. यातील ‘फक्त’ या शब्दाचे मोजमाप कशाच्या तुलनेत? – या निवडणुकीमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या आहे ३६५ आणि आश्चर्य असे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या आहे ३०२ एवढी. एकेकाळी शिवसेनेचे बालेकिल्ला असणाऱ्या काही जिल्ह्यांत ठाकरे नावाचा दबदबा घसरणीला लागल्याचा आलेख नगरसेवकांच्या संख्येत दडला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही फारसं बाळसं धरते आहे असं नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक आहेत १५९. म्हणजे भाजपच्या निम्मेच. मग पाऊल पुढं पडते आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचं. तेही सर्व आरोप आणि बदनामीसह.
मराठवाड्यातील ५२ पैकी फक्त दोन नगरपालिकेत नगराध्यक्षपदी ठाकरे गटाची शिवसेना निवडून आली. तीही आदिवासीबहुल नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीमध्ये. या दोन्ही नगरपालिकेत ठाकरे गटाने खूप चांगले काम केले होते असे नाही, तर स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील राग म्हणून मतदारांनी ‘मशाल’ पेटवली. त्यात शिवसेना नेत्यांच्या रणनीतीचा किंवा निवडणूक लढविण्याच्या पद्धतीचा संबंध नव्हता. आळशी माणसांच्या तोंडात आपोआप येऊन पडलेली दोन फळे, असे ते चित्र.
‘आम्ही फक्त मुंबई महापालिका बघणार, तुम्ही तुमचे निवडून या आणि तुम्हीच आम्हाला मोठे म्हणत रहा,’ ही ठाकरे गटाची वृत्ती फुटीनंतरही कायम राहिली. ठाकरे आणि कार्यकर्ते यांचा संवाद म्हणजे तक्रारी आणि उखाळ्या-पाखाळ्या हे चित्र बहरत गेले आणि ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा आवाज क्षीण होत गेला. इकडे ऐकून घेतले जात नाही. ‘बळ’ ही मिळणार नाही असे लक्षात आल्यावर मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी महापौरांची संख्या सात आहे. अनेक कार्यकर्ते निघून जात आहेत. नेते सोडून जात आहेत. सकाळचा माणूस संध्याकाळी कपडे बदलावे किंवा या खोलीतून त्या खोलीत जावे एवढ्या सहजपणे पक्ष बदलतो आहे. भाजपने शिवसेनेत फूट निर्माण केल्यानंतर पक्षीय जाणिवांचे अस्तित्व म्हणजे जणू बुडबुडाच बनले आहे. तसंही आता पक्ष आणि चिन्ह याचे अप्रूप कार्यकर्त्यांमधून संपत चालले आहे. राजकीय सोय महत्त्वाची हा ‘आदर्श’ साधन-सुचितेच्या संस्कारातील भाजपने घालून दिला असल्याने घाऊक पक्षांतराचा खेळ महापालिका निवडणुकीत सुरूच आहे.
गावातील मुजोर पुढाऱ्यांना प्रश्न कोण विचारायचा असा प्रश्न जेव्हा १९८० च्या दशकात निर्माण झाला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने तरुणांना प्रश्न विचारण्याची ताकद दिली होती. तेव्हा सुरेश नवलेसारख्या एका कार्यकर्त्याने फलक हटवला म्हणून मंत्र्याच्या तोंडावर थुंकून निषेध नोंदवला होता. पुढे ते राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. पण गावोगावी पुढाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तरुणांचे एक टोळके तयार होऊ लागले होते. काँग्रेस व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करायला लावणारी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे तरुणांनाच चेतवत होती. पुढे टीका अधिक धारधार होत राहिली.
सोनिया गांधी यांचे नाव न घेता बाळासाहेब एकदा भाषणात म्हणाले होते, ‘मघाशी मोटारीतून येताना माणसं शेतात कणसं खुडताना पाहिली. कळेल का त्या पांढऱ्या पालीला?’ एका भाषणात तर राहुल गांधींचा कसा बाप्तिस्मा केला आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी केली होती. तेव्हा ‘राहुल जॉन पॉल’ असं ते म्हणाले होते. याच काळात शरद पवार यांना उद्देशून ‘मैदाचं पोतं’ असं विशेषणही ते लावत, तेव्हा मराठवाड्यातील तरुण प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात पेटून उठत. आंदोलनातून उभारणारी सेना पुढे आणि त्याला बौद्धिक बळ देणारी भाजप मागे असे चित्र अनेक वर्षे होते. म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू राष्ट्र चौक उभा राहिला. हिंदू अशी ओळख धार्मिक न राहता राजकीय बनू लागली.
आता चित्र पूर्णतः बदलले आहे. आता दोन्ही शिवसेनेतील नेते ‘फॉर्च्युनर’मधून उतरतात. हातातील अंगठ्या, गळ्यातली सोन्याची चेन वगैरे ही दोन्ही शिवसेनेशी जोडले गेलेल्या कार्यकर्त्यांची खासी ओळख. जोपर्यंत हे कार्यकर्ते-नेते ठाकरे यांच्यासोबत होते, तोपर्यंत त्यांच्या गैरमार्गी व्यवहारावर कोणी प्रश्नचिन्ह उभे केले नाहीत. शिवसेनेत फूट पडली आणि कोण पत्ते खेळतो, कोणाचे आठ-नऊ दारूची दुकाने आहेत, कोण मटक्याची बुक्की चालवतो, कोणाचे पत्त्याचे क्लब आहेत, याची जाहीर चर्चा होऊ लागली. शिवसेनेचे खरे रूप मतदारांसमोर अधिक ढळढळीतपणे येऊ लागले. पुढे ५० खोके चर्चेत आले. मग अनेक घरांमध्ये मेहनत १५०० रुपये ‘लाडके’ पण घेऊन येऊ लागले आणि खोक्यांचा राग येण्याऐवजी त्याचं अप्रूप वाटू लागले. पुढे कोणीतरी मंत्र्यांनी मुंबईत ७२ व्या मजल्यावर घर घेतल्याचीही बातमी वृत्तवाहिनीवर झळकली. त्याचंही कौतुक झालं. घरात नोटांची बंडले दिसली तरी कोणाचे आक्षेप येत नव्हते. या काळात गरीबाची कणव म्हणून सुद्धा एखादे आंदोलन छेडले गेले नाही. उलट टेंडर, रस्ते यात अडकलेले कार्यकर्ते आणि तोंडी लावायला तुझा बाईट विरुद्ध माझा बाईट, असे वृत्तवाहिनीच्या आग्रहाखातर सुरू असणाऱ्या विरोधाचे खेळ सुरू राहिले.
ठाकरे गटाचे नेतृत्व हे नेहमी निवडून येणाऱ्या नेत्यांपेक्षा विधान परिषदेतील नेत्यांनीच केले. निवडून येणारे नेते मागच्या रांगेत हे चित्र कायम होते. अगदी अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे या मागणीसाठी केलेल्या मोर्चाच्या समारोपात जनतेच्या पसंतीस उतरलेल्या ओमराजे निंबाळकरांचे भाषण झालेच नाही. निवडून येणारे मागच्या रांगेत हा जणू नियम बनावा अशी स्थिती कायम आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातही फार आलबेल आहे असे नाही. संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार, संतोष बांगर, तानाजी सावंत यांनी निवडून आणलेल्या नगरसेवकांच्या जोरावर पक्ष वाढला असे चित्र मजबूत कोणी म्हणत असेल तर ते आभासी आहे. अन्य पक्षात जाण्यापेक्षा टेंडरची सोय म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांकडून आवाज उंच होण्याची शक्यता कमीच. जर पुढे जायचे असेल तर प्रस्थापितांना प्रश्न विचारणाऱ्यांची नवी पिढी बरोबर घ्यावी लागेल. ‘ठाकरे’ नावाच्या व्यक्तीमध्ये ती जादू शिल्लक असेल तर पुन्हा नवी मांडामांड करावी लागेल. अन्यथा ‘आवाज कुणाचा’ अशी घोषणा देणाराही अन्य पक्षात निघून जाईल. प्रतिसादाअंती मग फक्त शांतताच असेल.
