Migration for Work and Water : आटत जाणारं धरणपात्रातील पाणी, तळ गाठणाऱ्या विहिरी, शुष्क नद्यांचे आक्रोश, घटणारे उत्पन्न यात दिसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. जगणं आक्रसल्याने गाव सोडणं भाग बनू लागलं आहे. एका मोठ्या टायरच्या गाडीच्या टोकाला प्लास्टिकची घागर, बादली, पाण्याची टाकी, खुर्ची, मोटारसायकल सारं भरायचं आणि निघायचे. कुठे जायचं तर कमवायला. कारण काय तर दुष्काळ. ही संख्या या वर्षी खूप असेल. शहरी भागात राहणाऱ्यांनो, कदाचित आपलं शहर थोडं अधिक बकाल होईल. पण या वर्षी नाइलाज असेल. अनेकदा दुष्काळ दिसत नाही. पण जगणं आक्रसत जातं.
जसं बिहारमधून जगण्यासाठी लोक स्थलांतर करतात, तसंच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून सहा-सव्वासहा लाख लोकांचे दरवर्षी स्थलांतर होते. एका अर्थाने राज्यांतर्गत स्थलांतर करणारे हे सारे ‘बिहारी’ याच श्रेणीतील. या हंगामी स्थलांतरात यावेळी कोरडवाहू शेतकऱ्यांची साधारणतः एक लाखाची भर पडू शकते. पण या सर्वांना ऊसतोडणीचे काम देता येईल एवढा ऊस शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांत कर्नाटकातील कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातून मजूर जात असे. आता तिथेही दुष्काळ आहे. कर्नाटकातील साखर हंगामही महाराष्ट्राप्रमाणे आक्रसलेला आहे. राज्यातील ऊस हंगाम या वर्षी ६० किंवा ७० दिवसच चालेल, असा अंदाज आहे. परिणामी ऊसतोडणीचे मजुरी दिवस अर्धेच होतील. मग हे मजूर काय करतील? कमावण्यासाठी या मंडळीचे स्थलांतर पुढील काळात पुणे, मुंबईसारख्या शहरातच होईल. यास आता सुरुवात झाली आहे. कदाचित कोरोनानंतरचे हे मोठे स्थलांतर असू शकेल.
बीडमधून कारखाने सुरू होण्यापूर्वी ‘कोयत्या’चे व्यवहार ठरतात. एक कोयता म्हणजे दोन मजूर. सर्वसाधारणपणे नवरा-बायकोची जोडी. साखर कारखाने तोडणी कामगारांच्या मुकादमास आगाऊ रक्कम देतात. मुकादम ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या करतो. मग कोणत्या कारखान्याला कोणती टोळी, याचे नियोजन ठरते. व्यवहार ठरतात. जर मालमोटारीने म्हणजे ट्रकने ऊसतोडणी वाहतूक होणार असेल तर सहा लाख, दोन ट्रॉलीचे ट्रॅक्टर असेल तर पाच लाख, ट्रॅक्टर आणि बैलगाडीच्या ‘जुगाड’ करून केलेल्या वाहनास पाच लाख रुपये आणि नुसतीच बैलगाडी असेल तर एक लाख रुपये अशी क्षमतेनुसार आगाऊ रक्कम देण्याची पद्धत महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहे. कर्नाटकातील काही कारखाने यापेक्षाही अधिक रकमा देतात. उचल म्हणून मिळणारी रक्कम बुडवणे, पैसे घेऊन पळून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढतेच. एका कारखान्यावर जर तोडणीसाठी हार्वेस्टर अधिक नसतील तर तीन हजार ‘कोयते’ लागतात. म्हणजे सहा हजार मजूर. ही सगळ्या मजुरीचे दिवस कमी होतील. मग ही मंडळी काय करतील? दुष्काळ हा असा असतो. हाताचे काम काढून घेणारा. करपलेल्या पिकांमध्ये उत्पादनातील घसरणीबरोबर आणि हाताला काम नसणे हे खरे तर दुष्काळाचे लक्षण.
एक स्थलांतर रोजगारासाठीचे हे दिसणारे स्थलांतर. दुसरे स्थलांतर असेल ते पाण्यामुळे होणारे. गोदावरीचा काठ वगळता बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांतून पिण्याचे पाणी पुरेसे मिळणार नाही. लातूर किंवा धाराशिवसारखी शहरे ही सांडपाण्यासाठी महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यावर अवलंबून कधी नव्हतीच. या शहरातील प्रत्येक घरात विंधन विहिरी आहेत. या आता दीड-दोन महिन्यांत आटू लागतील. टँकरची व्यवस्था पुरेशी असणार नाही. यामुळे दुसरे स्थलांतर पिण्याच्या पाण्यामुळे होईल, असे चित्र आताच दिसू लागले आहे. पाण्यासाठी वणवण हा शब्द अक्षरशः खरा होईल, असे चित्र आहे. हे सारे घडताना पाणीपुरवठ्याच्या योजनांचा झालेला बट्ट्याबोळ, जलजीवन मिशनचे अपयश दुष्काळाच्या नावाखाली झाकणारी यंत्रणा तयार आहे. मुळात पाणीपुरवठ्याच्या समस्या दुष्काळ पडण्यापूर्वीपासूनच्या आहेत. दुष्काळात फावतं ते असं.
शहरात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना पैसे कसे पाठवायचे, हा खरा प्रश्न ग्रामीण भागात आतापासून निर्माण होत आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ, चाकूर भागातील शेतकरी तर नोव्हेंबरमध्ये गळाटले आहेत. काहींनी सोने गहाण ठेवायला सुरुवात केली आहे. काहींनी सावकारी कर्ज घ्यायला सुरुवात केली आहे. एखादा हंगाम वाया जाण्यामुळे सारे काही आक्रसत जाते. हे आक्रसणे जसे व्यक्तिगत पातळीवर असते, तसेच ते सामूहिकही असते. रब्बी हंगामाची पेरणीच या वर्षी होणार नाही, असे चित्र आहे. गेला खरीप हंगाम अतिवृष्टीचा होता. पण रब्बीमध्ये पेरणी उत्तम होती. या कालावधीमध्ये ११ लाख क्विंटल बियाणे लागले होते. यातील खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे नऊ लाख ३८ क्विंटल एवढे. आता हे बियाणे पडून राहणार म्हणजे नुसते बियाणे उद्योगाचा सुमारे तीन-साडेतीन हजार कोटींचा व्यवहार ठप्प होईल. दुष्काळ हा असा असतो. या आपत्तीचे रूप हळूहळू उग्र रूप धारण करते.
२००९ मध्ये आपण दुष्काळ संहिता बदलली. यात बरेच तंत्रज्ञान आले. आता ते किती उपयोगी यावर वाद सुरू झाले आहेत. पण दुष्काळाचा तसा मोठा इतिहास आहे. १८७१ ते २०१५ या कालावधीत २५ वेळा देशात मोठे दुष्काळ पडले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ११ वेळा. तेव्हा अन्नधान्याचा आणि पाण्याचा दुष्काळ होता. १९४१ ते १९६५ या कालावधीमध्ये तीन दुष्काळ होते. २०१५ मधील दुष्काळही अनेक राज्यांत होता. तेव्हा तो मराठवाड्यातही होता. यावेळी तो अगदी कोकणापर्यंत सरकला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुष्काळ १९७२ चा असे म्हणतात. दुष्काळाच्या तीव्रतेची तुलना याच वर्षाशी केली जाते. पण काही भागात वारंवार दुष्काळ पडतो. अहिल्यानगर, मराठवाडा, बुलढाणासारख्या जिल्ह्यांतील काही तालुके नेहमीच शुष्क असतात. या प्रत्येक दुष्काळात काही माणसं शहरात जातात. शहराची व्यवस्था बकाल करतात. पण ते तिथेही जगतात का, असा प्रश्न आहेच. गावातला माणूस गावात राहावा, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आलेले अपयश म्हणजे दुष्काळ.
ज्या चार जिल्ह्यांत सर्वाधिक दुष्काळ आहे, या भागात किती वनक्षेत्र आहे, हे समजून घेतले की दुष्काळ का आहे, हेही कळेल. लातूरमध्ये ०.१२ टक्के, धाराशिवमध्ये ०.०५, नांदेडमध्ये ०.९४, परभणीमध्ये ०.०४ टक्के, हिंगोलीमध्ये ०.११ टक्के एवढे जंगल आहे. एका गावातील एक मोठं कुंकू लावणारी आजी म्हणाली, पूर्वी पिंपळगाव, वडगाव, चिंचपूर अशी गावांची नावं होती. कारण ती झाडं त्या गावात होती. आता फक्त बाभळगाव आणि बोरी अशी नावे आहेत. दुष्काळ हा झाडांची सावली कमी होण्यात असतो, हे कळेल का आपल्याला?
