Latur farmer wife plowing video: वीज कोसळून बैल दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकद नसल्याने नांगराच्या औताला पत्नीला जुंपण्याची वेळ लातूरमधील शेकऱ्यावर आली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्याची विदारक स्थिती दाखवणारा हा हृदयद्रावक व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या कुटुंबाला त्वरीत मदत मिळवून देण्याची आणि शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आमदार पवारांनी या पोस्टमधून केली आहे.

लातूरमधील व्हिडीओ असल्याचा दावा

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओ पोस्टनुसार, सदर व्हिडीओ लातूर जिल्हा, देवणी तालुक्यातील बांबळी गावातील आहे. “काशिनाथ गायकवाड असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा एक बैल वीज कोसळून दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची त्यांची आर्थिक स्थिती नाही त्यामुळे त्यांच्यावर नांगराच्या औताला पत्नीला जुंपण्याची वेळ ओढवली”, असे रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अन्नदात्याची विदारक स्थिती असल्याचे आमदार पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

विनाअट सरसकट कर्जमाफीची रोहित पवारांची मागणी

देशाचं पोट भरण्यासाठी राबणाऱ्या अन्नदात्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागते हे अत्यंत वेदनादायी आहे, असे म्हणत पवारांनी शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याची विनंती केली. “स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन कुटुंबाला त्वरीत मदत मिळवून द्यावी”, अशी विनंती त्यांनी केली. तसेच, बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची मागणीही त्यांनी केली.

महिलेने मांडली कैफियत

व्हिडीओमधील महिला त्यांचे नाव हौसाबाई काशिनाथ गायकवाड असल्याचे सांगत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बैलावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याने औत ओढण्याची वेळ आल्याचे त्या सांगत आहेत. हौसाबाई त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच असल्याचे व्हिडीओत सांगत आहेत. वीज कोसळून बैल दगावल्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली मात्र मदत मिळाली नसल्याचे हौसाबाई सांगत आहेत. तसेच, औत ओढताना शारीरिक वेदना, त्रास होत असल्याची कैफियत देखील त्यांनी मांडली.