रक्षाबंधन म्हटलं की बहिणींनी भावांना राखी बांधण्याचा सण. भावा-बहिणीच्या नात्यातला गोडवा या दिवशी अगदी ओसंडून वाहताना दिसतो. पण मराठवाड्यातील अशा काही महिला आहेत, ज्यांनी त्यांच्या भावांना राखी बांधायलाच नकार दिला. या महिलांसाठी रक्षाबंधन हा आनंदाचा नसून अडचणीचा सण असल्याचीच परिस्थिती होती. पण मग या परिस्थितीवर या महिलांनी आपापसांतच मार्ग काढला आणि रक्षाबंधनाचा एक नवाच आदर्श त्यांनी समोर ठेवला. समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा आदर्श गेल्या ३ वर्षांपासून अर्थात २०२३ पासून या महिलांनी जपलाय!
मराठवाड्यातील काही विधवा, परित्यक्ता किंवा पतीपासून स्वतंत्र झालेल्या महिलांनी एकत्र येऊन याची सुरुवात केली. या महिलांना सुरुवातीला समाजाकडून हेटाळणी आणि संशयित नजरेनं पाहण्याचा सामना करावा लागला. मग सण साजरे करणं लांबच, सणांमध्ये त्यांनी सहभागी होण्यावरदेखील बंधनं आली. शेवटी २०२३ पासून त्यांनी या सर्व बंधनांना कोणतीही किंमत न देता एकमेकींनाच राखी बांधायला सुरुवात केली. या वर्षी तर बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमधल्या ४० गावांमधल्या महिला रक्षाबंधनासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यासाठी राखी म्हणजे जेव्हा कुटुंबानं साथ सोडली, तेव्हा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिलांशी तयार झालेल्या नात्याचं प्रतीक आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
“भाऊ जर तुमच्यासाठी उभे राहात नसतील, तर राखी का बांधायची?”
मराठवाड्यातील एका महिला संघटनेशी संबंधित ४५ वर्षीय आशालता आबासाहेब पांडे विचारतात, “जे भाऊ कित्येक वर्षं बहिणींच्या संपर्कातच राहिले नाहीत, त्यांची विचारपूस करत नाहीत, अशा भावांना महिलांनी राखी का बांधायची?” महिलांना पुरुषांच्या संरक्षणाची गरज असते, या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आशालता यांनी रक्षाबंधनाचा दिवस साजरा करणंच सोडून दिलं. त्या म्हणतात त्यांचा भाऊ त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि त्यांनीच त्यांच्या आई-वडिलांची आणि सासू-सासऱ्यांची काळजी घेतली आहे!
नातं फक्त रक्षाबंधन सणाच्याही पलीकडचं आहे का?
या महिलांसाठी त्यांचं त्यांच्या भावासोबतचं नातं फक्त या सणाच्या पलीकडे काही आहे की नाही? हा मुद्दा जास्त महत्त्वाचा असतो चित्रा बाळासाहेब पाटील यांची कहाणी याच तत्वावर आधारलेली आहे. वयाच्या १२व्या वर्षी त्यांचं विशीतल्या तरुणाशी लग्न लावून दिलं गेलं. पतीच्या जाचाला कंटाळून अखेर त्यांनी पुन्हा माहेर गाठलं. पण आई आणि भावानं त्यांचा स्वीकार केला नाही. आपल्या लहान मुलाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या चित्रा पाटील यांनी मग मिळेल ते काम केलं. एका महिला मंडळानं दिलेल्या १ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीतून त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. तिथून त्यांनी उभं राहायला सुरुवात केली. आज त्या त्यांच्यासोबतच्या इतर महिलांना राखी बांधतात.
नवऱ्याची मारहाण, भावानंही घरातून हाकललं!
अशीच काहीशी स्थिती बीडच्या ३६ वर्षीय मनिषा शिवाजी खाकरे यांची होती. १६व्या वर्षी त्यांचं लग्न लावून दिलं. पण नवरा दारूच्या आहारी जाऊन त्यांना मारहाण करत असे. दिवस-दिवस घरातून बाहेर काढत असे. जेव्हा त्या पतीला सोडून आपल्या माहेरी आल्या, तेव्हा आई आणि भावानं समाजाची भीती वाटली म्हणून त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. एवढंच नाही, तर पुन्हा पतीकडेच जायला सांगितलं. पण त्या पतीकडे परत गेल्याच नाहीत.
मनिषा खाकरे यांनी एक खोली भाड्यानं घेतली, मिळेल ते काम केलं आणि नंतर महिला हक्क चळवळीत दाखल झाल्या. त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी सुरू केली आणि आता त्या एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. पण तरी त्यांचं म्हणणं आहे की महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तरी महिलांना मिळणारी वागणूक काही बदलत नाही.
“तुम्ही स्वावलंबी झालात, तरी एकटी महिला म्हणून जगणं फार अवघड आहे. समाज तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारत राहतो”, असं त्या सांगतात. आपला घरमालक कशा प्रकारे वेळी-अवेळी खोलीचा दरवाजा वाजवत राहायचा, हा धक्कादायक अनुभवही त्यांनी सांगितला. त्यांच्यासोबतच्या इतर महिलांबाबत मनिषा खाकरे म्हणतात, “आम्ही सगळ्याजणी एकाच प्रकारच्या दु:खातून गेलो आहोत. यात आपल्या भावाची जागा कुणाला देण्याचा मुद्दा नाहीये. आपल्या पाठिशी मदतीला कुणीच नसताना ज्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने मदत केली, अशा महिलांचा आहे”!
