Pre-wedding Detective Verification Investigation Demand Increases: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानंतर पुण्यासह संबंध महाराष्ट्राला धक्का बसला. सिया गोयल आणि केतन अग्रवालच्या लग्नासाठी दोन्ही कुटुंबीय तयारी करत होते. साखरपुडा मोठ्या धामधुमीत पार पडला. लग्नाआधी फोटोशूट करण्यासाठी थेट बालीला जाण्याचाही बेत होता. मात्र सिया गोयलच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. लोहगडवरून केतन अग्रवालला ढकलून दिलेल्या घटनेनंतर या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबात हा प्रकार झाल्यामुळे आता मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये लग्न जुळवण्याआधी खबरदारी घेतली जात आहे. लग्न ठरविण्याआधी खासगी गुप्तहेरांकडून मुला-मुलीची पार्श्वभूमी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
लग्नाआधी चौकशी करण्याला प्राधान्य
खासगी गुप्तहेरांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या कुटुंबीयांकडून मुलीबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी खासगी गुप्तहेरांकडे चौकशीचे प्रमाण वाढले आहे. ज्या मुलीशी लग्न करायचे आहे, तिची इत्थंभूत माहिती मिळवण्याचा मुलाकडच्या नातेवाईकांचा प्रयत्न दिसतो. लोहगड प्रकरणात सिया गोयलने तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने केतन अग्रवालची हत्या केली. या गुन्ह्यामुळे लग्न घर असलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आपला मुलगा अशा घटनेला बळी पडू नये, यासाठी पालकांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच नातेवाईक, लग्न जुळवणारे संकेतस्थळ किंवा इतरांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता आता पालक मुलीची किंवा मुलाची पार्श्वभूमी तपासण्यासाठी विविध मार्गाचा वापर करत आहेत.
प्रसिद्ध खासगी गुप्तहेर रजनी पंडीत यांनी फ्री प्रेस जर्नलला माहिती देताना सांगितले की, लग्न जुळवण्याआधी चौकशी करण्याचे प्रकार यापूर्वीही होत असत. मात्र लोहगड प्रकरणानंतर याची संख्या वाढली आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या होणाऱ्या जोडीदाराविषयी सर्व माहिती जाणून घ्यायची आहे.

तीन लाखांपर्यंतचा खर्च
अशा प्रकारच्या चौकशीचा खर्च २५ हजार रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत असू शकतो, अशीही माहिती गुप्तहेरांनी दिली आहे. कोणती माहिती काढायची आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे, यावर शुल्क ठरते. पालकांना आपल्या सोयीनुसार कोणती माहिती हवी, याचीही सुविधा गुप्तहेरांकडून करून दिली जाते.
होणारा जोडीदार एखाद्या ठराविक ठिकाणी जातो का, जात असेल तर कितीवेळा जातो? त्याचे प्रेमसंबंध आहेत का? त्याने दिलेली आर्थिक उत्पन्नाची माहिती खरी आहे का? किंवा त्याच्यावर छळाचे आरोप किंवा गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती गुप्तहेरांकडून काढण्याचा पालकांचा कल असतो. याशिवाय नोकरी, शिक्षण, कुटुंबाची पार्श्वभूमी, यापूर्वी झालेल्या लग्नाची माहिती अशाप्रकारची इतर माहितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
आणखी एका गुप्तहेराने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आम्हाला महिन्यातून एखादवेळा लग्नापूर्वीची चौकशी करण्याची मागणी येत होती. मात्र आता आम्हाला प्रत्येक दिवशी किमान चार फोन येतात. तर प्रत्येक दिवशी किमान दोन कामे मिळतात. सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे त्याचाही नकारात्मक परिणाम समाजावर झालेला पाहायला मिळत आहे. नातेवाईकांच्या सांगण्यावरून किंवा मध्यस्थाच्या माहितीवर अवलंबून राहून आता पालक आपल्या मुलांचे लग्न लावून देण्यास तयार नाहीत.
