यंदा बाजारात ‘पणन’कडून कापूस खरेदीची शक्यता कमीच!

कापसाची किमान आधारभूत किं मत धाग्यानुसार ५८०० ते ६३०० आहे. त्याहून अधिक म्हणजे जवळपास ३० टक्के जास्त भाव मिळत आहे.

सध्या खुल्या बाजारात कापसाला चांगला दर

अमरावती : सध्या खुल्या बाजारात कापसाला चांगला दर मिळत असल्याने आणि  भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) थेट बाजारात खरेदीसाठी उतरल्याने राज्य कापूस पणन महासंघाच्या खरेदीची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे.

कापसाची किमान आधारभूत किं मत धाग्यानुसार ५८०० ते ६३०० आहे. त्याहून अधिक म्हणजे जवळपास ३० टक्के जास्त भाव मिळत आहे. बाजारात व्यापारी भाव पाडतील तेव्हा पणनच्या खरेदीची खरी गरज राहील. सध्या त्याची गरज नसल्याने पणनची कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.

हमीभावापेक्षा कमी किंवा हमीभावाइतके भाव कोसळल्यास त्यादृष्टीने पणन महासंघाने तयारी व नियोजन केले आहे, असे देशमुख यांनी सांगितले. या खरीप हंगामात राज्यात ३९.३७ लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली. मागील हंगामात ४२.०८ लाख हेक्टर होता.

सध्या पंजाब, हरयाणा व राजस्थानमध्ये कापसाला ७,२०० ते ८,३०० रुपये क्विंटल तर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रात ७,५०० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने साहजिकच पणन महासंघाच्या केंद्रांकडे कोणी धाव घेणार नाही. त्यामुळे अद्याप पणनची खरेदी सुरू झालेली नाही. वेळप्रसंगी ती सुरू  करण्याची तयारी आणि नियोजन झाले असल्याचे अनंतराव  देशमुख यांनी सांगितले.

१९९० मध्ये एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर पणन महासंघाची कापूस खरेदी शून्यावर आली होती. पण, करोना प्रादुर्भावात सर्वत्र टाळेबंदी असताना २०२० च्या हंगामात मात्र कापूस पणन महासंघाने विक्रमी खरेदी केली. राज्यात करोनाची परिस्थिती असताना कमी मनुषबळातही पणन विभागाने २०१९-२० च्या हंगामात  विक्रमी ९१ केंद्र आणि १९१ जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीत ९३ लाख ८३ हजार क्विंटल खरेदी केली. यापूर्वी २००४-०५ मध्ये २११.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती. यंदा खुल्या बाजारात कापसाला चांगला दर मिळत असल्याने पणन महासंघ स्वत:हून खरेदी प्रक्रि येत सहभाग घेणार नाही. पण केंद्र आणि राज्य शासनाकडून दिशानिर्देश आल्यास तशी तयारी करण्यात आली आहे. बाजारात कापसाची आवक वाढल्यानंतर देखील कापसाचे दर  हे हमीभावापेक्षा कमी होणार नाहीत, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मनुष्यबळाची समस्या

 २००५ मध्ये पणन महासंघात स्वेच्छानिवृत्ती योजना आली. त्यावेळी ४,८२२ कर्मचाऱ्यांपैकी ३,९९० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ८३२ कर्मचारीच उरले. ही संख्याही कालांतराने कमी कमी होत आता ११७ कर्मचाऱ्यांवर आली आहे. त्यात ६६ ग्रेडर आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Market this year marketing the chances of buying cotton are slim cci akp