सटाणा ते मालेगाव अंतर अवघे दीड तासाचे. परंतु सटाणा तालुक्यातील वराकडील मंडळींनी हे अंतर पार करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरचा वापर केल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात त्यासाठी कारण ठरली हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची आजोबांची अपूर्ण राहिलेली इच्छा. आजोबांची ही इच्छा नातवाने आपल्या पुतण्याच्या लग्नात पूर्ण करीत वधू-वरासह कुटूंबातील सदस्यांना मालेगाव येथील विवाह स्थळापर्यंत साक्षात हेलिकॉप्टरने आणले.
सटाणा तालुक्यातील लाडूद येथील एक बडे बागायतदार विनोद बुवाजी ठाकरे यांच्या कुटुंबाची एकेकाळी अतिशय हलाखीची परिस्थिती होती. परंतु डाळिंब बागेच्या उत्पन्नामुळे त्यांचे दारिद्र्य दूर झाले. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने पूर्वायुष्यात अत्यंत कष्टप्रद जीवन जगणाऱ्या ठाकरे यांच्या आजोबांनी आयुष्यात एकदा तरी हेलिकॉप्टरमध्ये बसावे अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. आजोबांची ही इच्छा आता पुतण्या ज्ञानेश्वरच्या लग्नाच्या निमित्ताने पूर्ण करण्याचा निश्चय विनोद ठाकरे यांनी केला. त्यासाठी वर पक्षाने मुंबईच्या एका विमान कंपनीकडून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. लाडूद व मालेगाव अशा दोन्ही ठिकाणी त्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले.
गुरूवारी दुपारी हेलिकॉप्टर मुंबईहून लाडूद येथे आले. वराचे आजी व आजोबा, काकू, मेहुणे यांना घेऊन ते मालेगावी गेले. या चौघांना येथे सोडल्यावर मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील जयश्री शेलार या वधूला घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा लाडूद येथे गेले. वराला घेतल्यावर वणी येथील सप्तश्रृंग गडाला हेलिकॉप्टरनेच प्रदक्षिणा घातल्यानंतर चार वाजेच्या सुमारास वधू-वर मालेगावात दाखल झाले. नवरदेवाचे हेलिकॉप्टरमधून आगमन होणार असल्याची बातमी मालेगावात समजल्यामुळे हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेल्या कॉलेज मैदानावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.