scorecardresearch

रशियन युवक-युवतीचे मालवणात शुभमंगल!

भारतीय पद्धतीनुसार पार पडला विवाह सोहळा, जिल्ह्यात विदेशी पर्यटकांनी पहिल्यांदाच बांधली लग्नगाठ

malvan, kokan, marriage
मालवण मेढा मुरलीधर मंदिर येथे रशियन युवक युवती भारतीय पद्धतीनुसार विवाह बंधनात अडकले. छाया : राजेश पारधी मालवण
जगाच्या विविध प्रांतातून पर्यटनाचा आणि खाद्य संस्कृतीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक भारताला भेट देतात. भारतातील विविध संस्कृती, परंपरा, चालीरिती आणि उत्सव याची मोहिनी या पर्यटकांना भुरळ घालते. वर्षभरापूर्वी अशाचप्रकारे भारत भेटीवर आलेल्या रशियातील एका युवक युवतीला हिंदू संस्कृतीत चालीरीतीसह संपन्न झालेला विवाह सोहळा याची देही याची डोळा पाहिला, अन् आपणही भारतातच अशाच पद्धतीने लग्न करायचे, असा पक्का निर्धार त्यांनी केला. फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेलेल्या एका मित्राच्या मदतीने ठरवण्यात आलेला हा विवाह सोहळा बुधवारी मालवणातील मेढा मुरलीधर मंदिर येथे पार पडला. पेशाने रशियन एअरलाईन्स या बड्या कंपनीत इंजिनिअर पदावर असलेल्या इवगीनिया मचीनिया (२६) आणि इलेक्ट्रिक बिझनेसमन असलेल्या पॉल मटालीन ( ३२) विवाह बंधनात अडकले. जात, पात, धर्म, या पलीकडे जाऊन मानवता हाच आपला धर्म आहे. असे सांगत भारतीय पद्धतीने विवाह सोहळा करण्याची आपली इच्छा आज पूर्ण झाली ही भावना त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गात पार पडलेला हा अशा पद्धतीचा पहिलाच विवाह सोहळा म्हणावा लागेल.
दीड वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मुंबईत असणाऱ्या गणेश देसाई यांची इवगीनिया मचीनिया या रशियन युवतीशी दोस्ती झाली. त्यानंतर काही महिन्यांनी इवगीनिया व तिचा मित्र पॉल मेटालीन हे पर्यटनासाठी भारतात आले. दिल्ली, मुंबई, गोवा व अन्य प्रांतात पर्यटन सफर करत असताना भारतातील हिंदू चालीरितींप्रमाणे पार पडलेला विवाह सोहळा त्यांनी अनुभवला. आपणही अशाच पद्धतीने लग्न करावे, असा विचार त्यांच्या मनात आला. पर्यटन सफरीनंतर पुन्हा आपल्या मायदेशी परतलेल्या या युवक युवतीने आपल्याला भारतात हिंदू चालीरीती प्रमाणे लग्न करायचे आहे. असे आपला मित्र गणेश देसाई यांना सांगितले. त्यानंतर देसाई याने आपल्या मालवणातील नातेवाईकांना फोन केला. त्यांनी मेढा मुरलीधर मंदिर येथील उदय वझे भटजींना सांगून विवाहाची तारीख मिळवली. त्यानुसार भटजींनी सांगितलेली सर्व तयारी पूर्ण करून आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने रशियन युवक युवती मुंबईतील मित्राच्या साथीने बुधवारी मालवणात दाखल झाली. लग्नाचे विधी सुरु झाले, मुंडावळ्या बांधत अंतरपाटही धरला गेला, आणि शुभमंगल सावधान म्हणत अक्षता पडल्या! रशियन युवक युवती लग्नाच्या बंधनात अडकले. मंदिरात सुरु असलेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचीही उपस्थिती सोहळ्यास लाभली. विदेशी पर्यटकांच्या या विवाह सोहळ्याची बातमी सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली आणि शहरात या लग्नाचीच चर्चा साऱ्यांच्याच तोंडी सुरु झाली.
विवाह सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना हे रशियन जोडपे म्हणाले, आम्ही कोणता धर्म मोठा आणि कोणता धर्म लहान असा फरक करत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे. आपण पाहिलेला तो विवाह सोहळा व त्यातील पद्धती आम्हाला आवडल्या. म्हणूनच आपण भारतात येऊन विवाह बंधनात अडकले. आमच्या घरच्या मंडळींचीही याला परवानगी आहे. याठिकाणी विवाह सोहळा पार पडला. त्याचे विवाह प्रमाणपत्र मिळावे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. ते न मिळाल्यास आम्हाला आमच्या देशात जाऊन विवाह प्रमाणपत्र मिळवावे लागेल. असे सांगत भारतातील प्रामुख्याने मालवणातील विवाहाचा हा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय असाच होता. अशा भावना त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marriage of russian couple in malvan

ताज्या बातम्या