scorecardresearch

सोलापूरचा ‘मार्शल लॉ’, चार हुतात्म्यांची माहिती दिनदर्शिकेत

संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ात एकमेव सोलापूरकरांनी १९३० साली बलाढय़ ब्रिटिश सत्तेला हुसकावून लावत तब्बल साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते.

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने (क्र. १) सोलापूरच्या मार्शल लॉ आणि चार हुतात्म्यांच्या अजरामर इतिहासाची सचित्र माहिती नववर्षांच्या दिनदर्शिकेतून समोर आणली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, राजशेखर शिवदारे, प्रा. श्रीकांत येळेगावकर, विवेक लिंगराज, हरिबा सपताळे आदी.

सोलापूर जि. प. कर्मचारी पतसंस्थेने दाखविली आस्था

सोलापूर : संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ात एकमेव सोलापूरकरांनी १९३० साली बलाढय़ ब्रिटिश सत्तेला हुसकावून लावत तब्बल साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते. तेव्हा घाबरलेल्या ब्रिटिश सरकारला सोलापुरात ‘मार्शल लॉ’ पुकारण्यात आला होता. या मार्शल लॉ लागू करण्याचेही सोलापुरातील हे एकमेव उदाहरण आहे. या मार्शल लॉ चळवळीत चार देशभक्तांना फासावर जावे लागले होते. सोलापूरकरांसाठी हा स्वाभिमानाचा विषय असला तरीही भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासात दुर्लक्षितच राहिला आहे. नव्या पिढीला या जाज्वल्य इतिहासाची माहिती व्हावी म्हणून सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेने (क्र. १) सोलापूरचा मार्शल लॉ आणि चार हुतात्म्यांसह ६९ स्वातंत्र्ययोद्धय़ांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.

या दिनदर्शिकेचे वैशिष्टय़ म्हणजे यात प्रत्येक पानावर  क्यूआर कोड  स्मार्ट फोनवर स्कॅन करताच सोलापूरच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य लढय़ाची सचित्र माहिती उपलब्ध होते. या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढय़ातील पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वि. गु. शिवदारे यांचे वारसदार राजशेखर शिवदारे, वसंत पोतदार, लेखक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या दिनदर्शिकेत अवघ्या बारा पानांमध्ये ६९ स्वातंत्र्य सैनिकांची त्यांच्या छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे. मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बानहुसेन आणि श्रीकिशन सारडा या थोर चार हुतात्म्यांचा प्रेरक इतिहास मांडण्यात आला आहे. मार्शल लॉ आणि चार हुतात्म्यांचा इतिहास सर्वप्रथम व्यं. गो. अंदूरकर यांनी ग्रंथरूपाने प्रकाशात आणला होता. हा ग्रंथ आजही या इतिहासासाठी प्रमुख दस्ताऐवज मानला जातो. याशिवाय प्रा. डॉ. नीलकंठ पुंडे आणि प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनीही या इतिहासावर पुस्तकांच्या रूपाने नव्याने प्रकाश टाकला आहे. तसेच प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. नभा काकडे, प्रा. डॉ. ऋतुराज बुवा यांनीही संशोधन केले आहे. त्यांचा आधार घेऊन या दिनदर्शिकेत सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष हरिबा सपताळे, उपाध्यक्ष धन्यकुमार राठोड, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, श्रीशैल देशमुख, डॉ. एस. पी. माने, त्रिमूर्ती राऊत, धन्यकुमार राठोड, हरिबा सपतेळ आदींनी दाखविलेली आस्था आणि परिश्रम मोलाचे ठरले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Martial law solapur information four martyrs calendar ysh

ताज्या बातम्या