सांगली : म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू हा सामुहिक आत्महत्या नसून गुप्तधनाच्या लालसेतून झालेले हत्याकांड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी सोलापूरमधील दोन भोंदूना अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी सायंकाळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसाळ (ता. मिरज) येथे दि. २०जून रोजी उघडकीस आलेल्या ९ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करीत असताना हा प्रकार सामुहिक आत्महत्येचा नसून सदोष मनुष्यवधाचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी आब्बास महमंदअली बागवान (वय ४८ रा. मुस्लिम बांशा पेठ, मुलेगाव रोड सरवदेनग, सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय ३० रा. वसंत विहार ध्यानेश्‍वरी नगर, प्लॉट नं. ५२, जुना पुणा नाका सोलापूर) या दोघांना आज अटक करण्यात आली आहे. हे दोघांनी विषारी औषध या सर्वाना दिले असल्याने सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे अधिक्षक गेडाम यांनी सांगितले.

या दोघा संशयितांची वनमोरे बंधू वारंवार भेटी होत होत्या. गुप्तधनासाठी या भेटी होत होत्या. यातून पैशाचे देणेघेणे झाले असावे, दोघेही घटनेच्या आदल्या रात्री म्हणजे १९ जून रोजी म्हैसाळ येथे येउन गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचेही गेडाम यांनी सांगितले.एकाच कुटुंबातील नउ जणांचा संशयास्पद मृत्यू दोन स्वतंत्र ठिकाणी झाल्याची घटना उघडकीस आली होती. डॉ. माणिक वनमोरे, रेखा वनमोरे, आक्काताई वनमोरे, प्रतिमा वनमोरे, आदीनाथ वनमोरे, शुभम वनमोरे या सहा जणांचे मृतदेह एका घरात तर दीड किलोमीटर अंतरावरील घरात पोपट वनमोरे, संगीता वनमोरे, अर्चना वनमोरे या तिघांचे मृतदेह आढळले होते. मृताजवळ मिळालेल्या दोन चिठ्ठीवरून सावकारांच्या तगाद्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक पातळीवर मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ सावकाराविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १९जणांना अटक करण्यात आली असून एक संशयित करोनारूग्ण असल्याने रूग्णालयात असून अन्य पाच जण अद्याप फरार आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता.अप्पर अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक अशोक विरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, भगवान पालवे, उप निरीक्षक विशाल येळेकर, संदिप गुरव, संजय कांबळे, प्रशांत माळी, संदिप नलवडे, सचिन कनप, नागेश खरात, विक्रम खोत यांनी आठ दिवस विविध ठिकाणी चौकशी करून या दोघा भोंदूना अटक केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mass suicide in maharashra mass suicide turns out to be murder amy
First published on: 27-06-2022 at 19:25 IST