कराड : वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने कराड दक्षिणेतील उंडाळे परिसरासह अनेक गावांची पुरती दैना उडवून दिली. सायंकाळी चारच्या सुमारास कोसळलेल्या या तासाभराच्या पावसासह प्रचंड गारपिटीने ओंड, उंडाळे, सवादे, कासारशिरंबे, मस्करवाडी यासह लगतच्या परिसरात जणू हाहाकार माजवला. चारचाकी वाहनांच्या काचाही फुटल्या. अनेक ठिकाणी पशुधन दगावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यासह हा पाऊस, गारपीट इतकी भयानक होती की, सर्वत्र सुपारीच्या आकाराच्या गारांचा खचून दिसून येत होता. १९ मार्चनंतर जवळपास १३- १४ दिवसांनी हा अवकाळी पाऊस झाला. त्यात सुपारी एवढ्या गारांनी अक्षरशः या परिसराची दणादण उडवून दिल्याचे उंडाळेचे ग्रामस्थ व सहकार खात्याचे अधिकारी प्रकाश पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. या तुफान अवकाळी पावसाने रब्बी पिकांबरोबरच विशेषतः या भागातील आंबा, पोपई आणि कलिंगडाचेही प्रचंड नुकसान केले. रब्बीची हातातोंडाशी आलेली पिके बळीराजाच्या डोळ्या देखत मातीमोल झाली.

झुकेनी, ब्रोकोली लाल कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा, काकडी, कारली, पडवळ यासह वेलवर्गीय पिके जागीच झोपुन वाया गेली. घरांवरील सौर ऊर्जा प्रणालीही फुटल्या. मोठ्या गारांच्या तुफान माऱ्यात मोटारगाडींच्या काचा फुटताना, या गाड्या चेपून नुकसान झाले आहे. सर्वत्र सुपारी सारख्या गारांचा खच पडल्याचे चित्र होते. या पावसाने कच्ची व कौलारू घरे, पशुधनांचे गोटे, पत्र्याची शेड कोसळली आहेत.

रब्बीची हातातोंडाशी आलेली पिके वाया जाताना, सर्वच प्रकारचे प्रचंड नुकसान झाल्याने ही ग्रामीण जनता हवालदिल झाली आहेत. नुकसानीची नेमकी माहिती तातडीने उपलब्ध झालेली नसलीतरी कराड दक्षिणेत पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने कधी नव्हे एवढे नुकसान झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.