Traffic Jam On Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करण्यासाठी या महामार्गावर मिसिंग लिंक बांधण्यात आला. मात्र त्याचे लोकार्पण करण्याच्या दिवशी महामार्गावरील प्रवाशांना मात्र कित्येक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंकचे लोकार्पण होत आहे. मुंबई – पुणे अतिजलद प्रवासासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार असला तरी त्याचा सोहळा मात्र लोकांना नकोसा झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसले.
शुक्रवारपासून सलग आलेल्या सुट्ट्या, शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्ट्या यामुळे गावाकडे निघालेले अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेही यांनाही मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दोन तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी व्हिडीओद्वारे महामार्गावरील परिस्थिती दाखवून दिली. त्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर परिस्थिती काय?
१९.८ किमी लांबीच्या घाटातील द्रुतगती मार्गाला पर्याय म्हणून १३ किमीचा मिसिंग लिंक बांधण्यात आला आहे. याच्या लोकार्पणासाठी मुंबई-पुणे महामार्गावर तयारी करण्यात आली. त्यातच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी या मार्गाने थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्यटक सकाळपासून महामार्गावर आले. यामुळे पहाटेपासूनच याठिकाणी अभूतपूर्व कोंडी पाहायला मिळाली.
लोकार्पणाच्या कार्यक्रमावर प्रवाशांची नाराजी
शुक्रवार ते रविवार मुंबई-पुणे महामार्गावर नेहमीपेक्षा अधिक वाहने धावत असतात. याची प्रशासनाला कल्पना असतानाही शुक्रवारचा दिवस लोकार्पणासाठी निवडल्यामुळे अनेक प्रवाशांनी कार्यक्रमाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसऱ्या बाजूला प्रशासनाला मात्र वाहनांची गर्दी हाताळण्यात मोठी धडपड करावी लागली. महाबळेश्वरला कुटुंबासह सहलीला चाललेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही उन्हाळी सुट्टीसाठी महाबळेश्वरला चाललो होतो. मात्र अनेक तासांपासून आमची गाडी जागेवरून हलू शकलेली नाही. आमची सहल वाहतूक कोंडीत वाया जाईल की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

उद्घटानाची वेळ चुकली?
कडक उन्हात तासनतास एकाच जागी वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही वाहनांमध्ये बिघाड झाल्यामुळे ती बाजूला करण्यात आली. कोंडीचा त्रास त्यात वाहन बिघडल्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना काही प्रवाशांनी कार्यक्रमाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सलग सुट्ट्यांचा अंदाज घेऊन सरकारने उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी घेतला असता तर बरे झाले असते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली.
पाणी, अन्नावाचून काही प्रवाशांचे हाल
घाटात अडकलेल्या वाहनांमधील प्रवाशांचे पाण्यावाचून हाल झालेले पाहायला मिळाले. अनेकजण कुटुंबासह प्रवास करत असल्यामुळे त्यांच्याकडील पाण्याच्या बाटल्या संपल्या होत्या. ऐन उन्हात पाणी न मिळाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचा परिणाम खालापूर टोलनाक्यापासून दिसत होता. खालापूर टोलनाक्यापासून वाहने मंदगतीने पुढे जात होते. काही वाहनांनी वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथेही काही प्रमाणात कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोकार्पणाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही तासांनी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असे सांगितले गेले. ही मार्गिका खुली झाल्यास वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.
मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही खोळंबली
मुंबईहून पुण्याच्या दिशेने वाहतूक कोंडीबरोबरच पुण्याहून निघालेली वाहनांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एका प्रवाशाने वृत्तवाहिनीशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मी कुटुंबाला घेऊन मुंबईला निघालो. दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. आमच्याकडून टोल वसूल केला जातो, मात्र सुविधा तितक्या दिल्या जात नाहीत. जेव्हा द्रुतगती महामार्ग तयार झाला, तेव्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे सांगितले गेले. मात्र आज परिस्थिती बघा काय झाली? नवीन मार्ग कितीही बांधले तरी त्याचे व्यवस्थापन उत्तमरित्या केले नाही तर वाहतूक कोंडीला वारंवार समोर जावे लागेल.”
मुख्यमंत्र्यांच्या श्रेयवादामुळे वाहतूक कोंडी
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या श्रेयवादामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. “मी केले, मी केले…”, हे दाखविण्याचा आटापिटा दिसून येत आहे. जेव्हा सलग सुट्ट्या येतात, तेव्हा महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होते, हे सर्वांनाच माहीत आहे. मग काल पाहणी करून आज महाराष्ट्र दिनानिमित्त लोकार्पण करण्याचा घाट घातला गेला. याचा अर्थ हे लोकांसाठी नाही तर दिखाव्यासाठी सुरू आहे.

महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आहे कसा?
मुंबई – पुणे या दोन शहरातील अंतर आणखी कमी करून प्रवास अधिक जलद करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे काम हाती घेतले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये या कामाला दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली – कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी झाला आहे. या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात आले आहेत. यातील एक बोगदा १.७५ किमीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. २१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा असून हा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असेल, असा दावा केला जात आहे. तर ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा जात आहे.
जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात आले असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात आले आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. ६,६९५.३७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. तर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे.
