सोलापूर : शेकडो कोटी खर्च करूनही निकृष्ट विकास कामे झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पासह इतर विकास कामांची चौकशी व्हावी आणि संबंधित जबाबदार अधिका-यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सोलापूर शहर मातंग समाजाच्या झेंड्याखाली सोलापूर,महापालिकेसमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा >>> नांदेड मृत्यू घटना अन्य ठिकाणी होण्याची भीती, राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४४ टक्के पदे रिक्त




उध्दव ठाकरेप्रणीत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून स्मार्ट सिटी प्रकल्पासह सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी योजनेचे संशयाच्या भोव-यात सापडलेले काम, नगरोत्थान योजनेखाली झालेले रस्ते, अमृत योजनेखाली झालेली मलःनिसारण योजना, दलित वस्ती सुधारणा व इतर विकास कामांच्या दर्जाकडे नागरिकांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या सर्व कामांवर कोट्यवधींचा झालेला खर्च पाण्यात जाण्याची भीती उत्तमप्रकाश खंदारे यांनी व्यक्त केली. विशेषतः स्मार्ट सिटी प्रकल्पातील विकासकामे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण असून याप्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तीच्या सनियंत्रखालील चौकशी समिती नेमावी आणि दोषी अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास स्मार्ट सिटी प्रकल्पातून झालेल्या विकास कामांच्या ठिकाणी स्वतंत्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा >>> “मला भाजपाचा खूप त्रास”, बच्चू कडूंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मित्रांसाठी फिल्डिंग…”
यासंदर्भात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या प्रशासक तथा सोलापूर सिटी डेव्हलफमेंट कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले-तेली यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात युवराज पवार, श्रीकांत देडे, रमेश बोराडे, विद्याधर पोटफोडे, हिरालाल अडगळे, प्रभाकर कांबळे, महेश भालेराव, शिवाजी गायकवाड, शहाजी गायकवाड आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.