मुंबई: माथाडी कामगार आणि त्यांच्या पाठीवरील ओझे हे त्यांच्या पाचवीलाच पोचले आहे हे ओझे कमी व्हावे म्हणून माथाडी कामगार सातत्याने सरकारकडे मागणी करत होते अखेर योजने ५० किलो पर्यंत कमी झाले ओझे कमी करण्याचा हा संघर्ष गेली ५० वर्षाचा आहे त्यासाठी माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील त्यांची पुत्र नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे अध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्व कामगार नेत्यांचा संघर्ष लक्षवेधी आहे.

राज्यातील माथाडी कामगार काही वर्षापूर्वी १०० किलोचे ओझे सहज उचलत होते. या वजनाचा होणारा त्रास कमी व्हावा यासाठी माथाडी कामगार संघटना गेली अनेक वर्षे प्रयत्नशील होत्या. केंद्र सरकारने हे ओझे कमी करण्यात यावे असा निर्णय २७ वर्षापूर्वी दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी होत नव्हती. कामगारांच्या आंदोलनानंतर हे ओझे आता ५० किलोने कमी करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला असलल्याची घोषणा कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केली.

माथाडी कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच एक स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. या नवीन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश ॲड.फुंडकर यांनी दिले.

माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यात येऊ नये यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ॲड फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये माथाडी कामगारांच्या पाठीवरील वजन कमी करण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळण्याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपर्यंतच वजनाची हाताळणी करण्याबाबत परिपत्रक काढले जाणार आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. इतर राज्यांमध्येही या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल, असे फुंडकर यांनी सांगितले.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ (लासलगाव) यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, उपबाजार समित्या, व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, बियाणे महामंडळ, वखार महामंडळ तसेच इतर संबंधित आस्थापनांना कोणत्याही उद्योग अथवा व्यवसायात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची चढ-उतार किंवा हाताळणी माथाडी कामगारांकडून करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आता संर्पूण राज्यात करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.