अलिबाग : प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता माथेरानचे नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत चौधरी यांनी शार्लोट तलावाचे पाणी परस्पर सोडल्याचे आता समोर आले आहे. तलावात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ कमी करण्यासाठी नगराध्यक्षांनी काही नगरसेवकांच्या उपस्थितीत तलावाचा दरवाजा उघडून पाणी सोडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची चित्रफीतही समोर आली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचा अहवाल मागविला आहे.

‘आले नगराध्यक्षांच्या मना, कोणाचे काही चालेना’, अशी स्थिती माथेरानकरांची झाली आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी शार्लोट तलावाच्या गेट वॉलचे पूजन करून पाणी सोडल्याचे चित्रफितीत दिसत आहे. यावेळी गाळ काढण्यासाठी नियुक्त केलेला ठेकेदार तसेच काही नगरसेवक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नगराध्यक्ष चौधरी आणि प्रशासनाला तलावातून सोडलेले पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही शार्लोट तलावाचा दरवाजा बंद करण्यात आला नाही. त्यामुळे तलावातील संपूर्ण पाणी बाहेर पडले. मंगळवारी मुसळधार पावसात तलावाचा वॉल उघडून गाळयुक्त माती वाहत्या पाण्यात सोडत गाळ काढण्याचे काम सुरू होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविला अहवाल

तलावातील गाळ काढण्यासाठी पाणी सोडण्यात आल्याचे नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभाग तसेच माथेरान मॉनिटरिंग कमिटीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. अशी कोणतीही परवानगी न घेताच नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी पाणी सोडल्याची माहिती आता समोर आली आहे. या घटनेची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.