अलिबाग : माथेरानला पाणीपुरवठा करणार्या शार्लोट तलावाचे पाणी सोमवारी अचानक सोडण्यात आले. पाणी कोणी आणि कशासाठी सोडले, याचा खुलासा झालेला नाही, पण ऐन पावसाळ्यात तलावाचे पाणी सोडल्याने, माथेरानचे पर्यटन आणि स्थानिकांचा पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
माथेरानमधील हिरवाईत वसलेला हा तलाव केवळ पर्यटनस्थळ नसून शतकाहून अधिक काळ माथेरानच्या जलव्यवस्थेचा आधार मानला जातो. माथेरानमधील पाणीसमस्या दूर व्हावी या हेतूने ब्रिटिश काळात या तलावाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १८८० साली तलावासाठी जागा निश्चित करण्यात आली. नंतर १९५० ते १९५६ मध्ये तलावाचा विस्तार करण्यात आला. ज्यात साधारणपणे १२७ दशलक्ष लिटर पाण्याची साठवण केली जाते. यातून माथेरानला पाणीपुरवठा होतो. ऑगस्ट महिन्यात पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला असताना तलावाचे पाणी सोडून देण्यात आल्याने खळबळ उडाली.
माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी मी सुट्टीवर आहे, याबाबत नगराध्यक्षांनाच विचारा, असे उत्तर दिले, तर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी बैठकीत असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील पाणी कोणी सोडले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाणी सोडल्यामुळे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात आपत्कालीन पूरपरिस्थिती उद्भवू शकते. धरणांमधील आणि तलावामधील पाणी सूचना न देता सोडणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
माथेरानच्या तलावातील पाणी सोडताना अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता हा आदेश देणार्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई जिल्हा प्रशासन करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
गाळ काढण्यासाठी पाच कोटींचा निधी
माथेरानमधील शार्लोट तलाव गाळाने भरल्याने तो काढण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तलावातून काढलेला गाळ माथेरानमध्येच संकलित करून तो पावसाळ्यानंतर रस्ते बांधणीसाठी वापरणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराकडून हे काम योग्य प्रकारे झाले नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. गाळ काढण्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. तलावातील गाळ माथेरानच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. निविदेनुसार तो काढून पांडे मैदानात नेऊन टाकण्यात यावा, अशी मागणी माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केली होती.
पर्यटनाला फटका
या प्रकारामुळे माथेरानचा पर्यटन व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. महिनाभरात पाऊस पुरेसा न झाल्यास त्याची झळ माथेरानकर आणि पर्यटनाला बसण्याची शक्यता आहे. माथेरानमधील शार्लोट तलावातील गाळ हा रस्ते बनविण्यासाठी वापरला जातो. माथेरानमध्ये माती खोदण्यास बंदी असल्याने हा गाळ महत्त्वाचा असतो.
तलावातील गाळ माथेरानच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अशा प्रकारामुळे माथेरानच्या पर्यावरणाची हानी होऊ शकते. -मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष
शार्लोट तलावातील गाळ काढणे गरजेचे आहे, पण तो काढताना त्याची साठवणूकही महत्त्वाची ठरते. -सीताराम कुंभार, विरोधी पक्षनेते
प्रशासनाला न कळवता तलावातील पाणी सोडणे योग्य नाही. पाणी तातडीने थांबविण्याचे निर्देश नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. –किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड</p>
