अलिबाग- थंड हवेचे ठिकाण म्हणून जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेल्या माथेरान मध्ये पावसाने कहर केला आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात ४०८ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून, पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. माथेरान सह रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात या वर्षातील सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला असून, रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१५.४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ४०८ मिमी पाऊस माथेरान येथे झाला असून, त्यानंतर कर्जतमध्ये २९१ मिमी, पनवेलमध्ये २८२.२ मिमी, खालापूरमध्ये २७४ मिमी, पेणमध्ये २६५ मिमी आणि मुरूडमध्ये २५८ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अलिबाग १९६ मिमी, तळा १९२ मिमी, माणगाव १८८ मिमी, रोहा १७१ मिमी, उरण १४८ मिमी, महाड १२१ मिमी, पोलादपूर १११ मिमी आणि श्रीवर्धन येथे १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर पातळगंगा नदी इशारा पातळीवर वाहते आहे. खालापूर, खोपोली, रसायनी, आपटा परिसरातील सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात इतरही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच घाटमार्ग आणि डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासन सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई पुणे दृतगती मार्गांना जोडणाऱ्या सावरोली येथील पाताळगंगा नदीवरील पूलाला लागल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील वळवली परिसरात सखल भागात पाणी शिरले आहे.
रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलाला कुंडलिका नदीचे पाणी लागल्याने, या पूलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. नव्या पूलावरून वाहनचालकांना प्रवास करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत जवळ पाणी साचल्याने, महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. तर पाली खोपोली मार्गावरही पाणी आल्याने हा मार्गही वाहतूकीसाठई बंद करण्यात आला आहे.
