अलिबाग – जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. सदाहरित वनांचे आच्छादन असलेल्या या परिसरात सध्या बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकही धास्तावले आहेत.
मंगळवारी संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास एक तरुण बिबट्या माथेरानच्या घाटात फिरताना दिसला. घाटातून खाली उतरत असताना वाहन चालकांना घाट परिसरात बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले. या बिबट्याचे त्यांनी चित्रीकरणही केले. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहन चालक आणि पर्यटक धास्तावले आहेत.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान मध्ये सध्या पर्यटन हंगाम जोमात आहे. हजारो पर्यटक या ठिकाणी दर आठवड्यात दाखल होत आहेत. असे असताना माथेरानमध्ये बिबट्याचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान वनविभागाने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे म्हटलं आहे. अन्नाच्या शोधात बिबटे उन्हाळ्यात बाहेर पडतात . त्यामुळे रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. आणि बिबट्या दिसल्यास वन विभागाला सुचित करावे असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
