अलिबाग : माथेरान-नेरळ-कळंब (एसएच-१०९) मार्गावरील रस्ता सुधारणा कामांच्या पार्श्वभूमीवर माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत माथेरान-नेरळ-कळंब रस्त्याच्या सुधारणा व मजबुतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांतर्गत किमी ०+०० ते किमी २०+४०० या टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. मात्र, माथेरान ते नेरळदरम्यानचा घाट रस्ता अरुंद, तीव्र उताराचा आणि धोकादायक वळणांनी युक्त असल्याने कामकाजादरम्यान पर्यायी वाहतूक व्यवस्था करणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार, माथेरान हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असल्याने शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. माथेरानमध्ये जाण्यासाठी नेरळ-माथेरान घाट रस्ता हा एकमेव मार्ग असून दस्तुरी नाका येथील पार्किंगची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक घाट रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढतो.
या परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुधारणा कामे केवळ सोमवार ते गुरुवार या कालावधीत करण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवशी कामे करण्यात येणार नाहीत. तसेच काम सुरू असताना घाट मार्गावर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी राहणार आहे.
दरम्यान, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले असून त्यांना मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
