रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आश्वासन
माथेरानची राणी सुरक्षितता आणि तांत्रिक कामासाठी बंद करण्यात आली आहे. ती लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी दिले. मुंबईत माहीम येथील भाजप कार्यालयात ते बोलत होते.
रेल्वे सेवेतील समस्यांबाबत भाजप कार्यालयात एक विशेष बठक झाली. या वेळी माथेरानकरांच्या शिष्टमंडळाने रेल्वेसेवा तात्काळ सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनासोबत त्यांनी ‘लोकसत्ता’मधील ‘एका राणीची विराणी’ या अग्रलेखाची प्रतही प्रभू यांना दिली. माथेरानमधील सर्व पक्षीय नेते या वेळी उपस्थित होते. माथेरानची रेल्वे ही देशाची शान असून ती बंद पडू दिली जाणार नाही. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू केली जाईल आणि नंतर नेरळ ते माथेरान दरम्यान रेल्वे सेवा सुरळीत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक साकेत मिश्रा या वेळी उपस्थित होते. माथेरानच्या रेल्वेसाठी आपण स्वत: पाठपुरावा करू, असे शेलार यांनी स्पष्ट केले.