पंढरपूर : ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने खडूस येथील माउलींचे गोल रिंगण पार पडले. तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण रंगले. हे रिंगण सोहळे झाल्यावर माउलींची पालखी वेळापूर तर तुकोबारायांची बोरगाव येथे मुक्कमी पोहोचली.

उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश होत असून पिराची कुरोली येथे मुक्काम राहणार आहे. आता भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

माळशिरस येथे काल मुक्कामी असलेल्या माउलींच्या पालखीने बुधवारी सकाळी मार्गक्रमण केले. काही वेळातच खुडूस फाटा येथे हा सोहळा पोहोचला. येथील मैदानावर माउलींच्या पालखीचे दुसरे रिंगण रंगले. भव्य मैदानावर भाविकांची अगोदरपासूनच मोठी गर्दी जमा झाली होती. हातात भगवी पताका, टाळ-मृदंगाचा, हरिनामाचा जयघोष आणि रिंगण सोहळा पाहण्याची उत्सुकता भाविकांना लागली होती. रिंगणाच्या ठिकाणी माउलींची पालखी विराजमान झाली. त्यानंतर माउलींचे अश्व आले. चोपदाराने इशारा करताच उपस्थित भाविकांनी बोला पुंडलिक वरदेचा जयघोष केला. टाळ-मृदंग आणि माउली माउलीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेले आणि अश्वाने गोल फेरी पूर्ण केली. रिंगण झाल्यावर विविध खेळ, फुगडीचा आनंद भाविकांनी घेतला. यानंतर पालखी सोहळा वेळापूर येथे विसावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीने अकलूज येथून प्रस्थान ठेवले आणि पालखी माळीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी उभे रिंगण पार पडले. तुकोबारायांच्या पालखीचा नगारखाना त्यानंतर पालखी आणि पाठोपाठ अश्व आले. दुतर्फा भाविकांनी रांगा लावल्या होत्या. विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात अश्वाने उभी दौड पूर्ण करून पालखीला नमस्कार करून रिंगण सोहळा संपन्न झाला. यानंतर विविध खेळ खेळून भाविकांनी मनमुराद आनंद घेतला. यानंतर पालखी बोरगाव येथे मुक्कमी पोहोचली. आता संतांच्या पालख्या पंढरी नगरीच्या समीप आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.