मुंबई, पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीचा सोहळा आणि मिरवणुका पार पडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई आणि पुण्यातल्या गणेशभक्तांचा उत्साह किती चांगला आहे याचं कौतुक त्यांनी केलं. तसंच मुंबई पोलिसांनी मुंबईत जे नियोजन विसर्जनाच्या दिवशी केलं आहे त्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. यावेळी विरोधकांबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही टोला लगावला आहे.
गणेश उत्सवाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
“अनंत चतुर्दशीचं पावन पर्व आहे. श्रीगणरायाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये महाराष्ट्रभरात प्रचंड उत्साह पाहण्यास मिळतो आहे. आपण मुंबईत आहोत आणि मुंबईतही भाविकांची, भक्तांची उत्साहाने भरलेली गर्दी पाहायला मिळते आहे. दहा दिवस ज्या बाप्पांना अतिशय भक्तिभावाने पूजलं त्यांच्या आज विसर्जनाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे विसर्जनाच्या मिरवणुकीचा आनंद असतो. तसंच लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाचं दुःखही असतं त्यामुळेच पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आपण त्यांना करत असतो. मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी जास्त वेळ मिरवणुका चालतात. दोन्ही शहरांमध्ये अतिशय चांगली व्यवस्था पोलीस विभागाने, महापालिकांनी केली आहे. शांततेत या मिरवणुका होत आहेत. भक्तांना माझी विनंती आहे की सुरक्षेने, सावधिगरी बाळगून मिरवणुकांमध्ये सहभाग घ्यावा.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलिसांचं मी विशेष कौतुक करेन – देवेंद्र फडणवीस
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई पोलिसांचं मी विशेष कौतुक करेन. देशातल्या आणि जगातल्या अतिशय प्रोफेशनल फोर्सपैकी एक मुंबई पोलीस आहेत. कुठलाही आणि कितीही मोठा इव्हेंट असू द्या तो नीट नियोजित करून आणि लोकांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने नियोजन करतात. मुंबई महापालिकेनेही उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दरवर्षी काही ना काही नवीन या ठिकाणी पाहण्यास मिळतं.
विरोधकांबाबत प्रश्न विचारातच काय म्हणाले मुख्यमंत्री?
गणपती ही बुद्धीची देवता आहे, विरोधकांबाबत बाप्पाकडे काय मागणं मागितलंत असं विचारलं जाताच, मुख्यमंत्री म्हणाले, “मला असं वाटतं की सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचं विसर्जन व्हावं अशा प्रकारची बाप्पाच्या चरणी माझी प्रार्थना आहे” विरोधकांबाबत प्रश्न विचारला जाताच देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. ज्याची चर्चा आता रंगली आहे.
