आमदार विजय भांबळे यांच्या सत्काराच्या कारणावरून झालेल्या मारहाणीनंतर बामणी येथील गावकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेत परस्परांवर गुन्हे दाखल न करण्याचा निर्णय घेतला. परंतु पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील ११८ जणांवर गुन्हे दाखल करुन ७६ जणांना अटक केली.
नवनिर्वाचीत आमदार विजय भांबळे यांच्या सत्कार कार्यक्रमादरम्यान दि. ४ नोव्हेंबर रोजी दोन गटात हाणामारी होऊन पाच जण जखमी झाले होते. सुरुवातीला दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात येणार होते. परंतु रात्री उशिरा आ. भांबळे यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. गावकऱ्यांनी आपआपसात हे प्रकरण मिटविले असले तरी पोलिसांनी विजय भांबळे यांच्या सत्कार समारंभात गरकायद्याची मंडळी जमा करून पोलीस ठाण्यावर दगडफेक करून कामात अडथळा निर्माण केला व शासकीय मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा ११८ जणांवर दाखल केला. यापकी ७६ आरोपींना मंगळवारी रात्रीच अटक केली तर इतर आरोपींची धरपकड सुरूच आहे. दरम्यान घडलेला प्रकार गैरसमजातून झाल्याचे भांबळे यांनी सांगतिले.