बुलढाणा : वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला १३ लाखात प्रवेश करून देतो असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रशांत रानडे (६५) असे आरोपीचे नाव असून तो रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटर, मायणी (ता. खटाव, जि. सातारा) चा संचालक आहे. तो सध्या काजूपाडा, बोरीवली पूर्व, मुंबई येथे वास्तव्यास आहे. बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संबंधित मंत्रालयाशी संबंधित ही घटना असल्याने राज्याच्या वैद्यकीय शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यातही डोणगाव पोलीस ठाणे व फिर्यादी हे नामदार प्रतापराव जाधव यांच्या गृह विधानसभा मतदारसंघ असलेल्या मेहकर मतदारसंघातील ही घटना असल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. डोणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटबोरी (ता. मेहकर, जि. बुलढाणा )येथील प्रकाश पुंजाजी पाखरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली.

शिक्षक व शेतकरी असलेल्या पाखरे यांना आरोपीने प्रभावित करून विश्वासात घेतले. आरोपीचे संचालक पद व बोलण्याला बळी पडून ५१ वर्षीय राजेश पाखरे हे अमिषाचे बळी ठरले. त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असा विश्वास संपादन करून आरोपी डॉ. रानडे यांनी त्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. मागील मार्च २०२३ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी तब्बल १३ लाख ११ हजार रुपये उकळले. मात्र, मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. शिक्षक असलेले पाखरे यांनी वेळोवेळी रानडे यांच्याकडे प्रवेशाची विचारणा केली. प्रवेश होत नसेल तर किमान दिलेले तेरा लाख परत करण्यासाठी मागणी केली. मात्र, ना मुलीला प्रवेश मिळाला ना लाखोंची रक्कम मिळाली.

यामुळे अखेर राजेश पुंजाजी पाखरे यांनी १६ डोणगाव पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या आदेशान्वये पोलीस हवालदार संजय घिके करीत आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन डोणगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.