येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी वैद्यकीय पथक व सुसज्ज रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तथा प्रांतधिकारी संजय तेली यांनी दिली. एका महिलेचा मंदिरात शनिवारी प्राथमिक उपचाराअभावी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. अखेरीस मंदिर समितीने भाविकांसाठी ही सेवा सुरू केली आहे.

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये एका महिला भाविकाचे हृदयविकाराने निधन झाले होते. या महिलेस प्राथमिक वैद्यकीय उपचार तसेच वेळेत रुग्णवाहिका मिळू शकली नाही. त्यामुळे मंदिर समितीने तातडीने ही सेवा सुरू करावी अशी मागणी झाली होती. या पाश्र्वभूमीवर मंदिर परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर मंडप येथे तीन बेडचा वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी, दोन नर्स, दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत एक सुसज्ज रुग्णवाहिका तसेच सेवा बाल रुग्णालयाची रुग्णवाहिका सुरू केली असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तथा प्रांतधिकारी संजय तेली यांनी दिली.

ही रुग्णवाहिका पहाटे ५.३० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आषाढी यात्रेनंतर कायमस्वरूपी वैद्यकीय पथक मानधन तत्त्वावर नेमण्यात येणार आहे. असे जरी असले तरी एक दुर्घटना घडल्यानंतर मंदिर समितीला अखेरीस जाग आली.