औरंगाबाद – राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. या संदर्भातील निर्णय गुरूवारी रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विभागाचे आयुक्त, सचिव व संचालकांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती येथील घाटीतील महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.
या बैठकीत करोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापक, डॉक्टरांना सेवेत कायम करण्यासह सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने प्रलंबित प्रमुख मागण्यांवर मंत्री अमित देशमुख यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. डॉक्टरांना सेवेत कायम करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल. तर सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री अमित देशमुख यांनी संघटनेला दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येत असून शनिवारपासून वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले. वैद्यकीय प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे कर्क रुग्णांवरील १० तर इतर ४o शस्त्रक्रिया सोमवार रखडल्या. त्यानंतरच्या दिवसापासून इतर नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. घाटीतील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. बाह्यरुग्ण विभागाचे रूग्ण तपासणीचे कामकाज नवशिक्षित डॉक्टरांवर सुरू असून अनुभवी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले होते. केवळ अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी अनुभवी डॉक्टर सेवा देत होते.



