Premium

Mira Road Murder: “सुप्रियाताई, तुमची रंग बदलण्याची कला सरड्यालाही…”, चित्रा वाघ यांची टीका; ‘मोठ्ठ्या ताई’ असा उल्लेख करत केलं ट्वीट!

Mira Bhayander Murder Case: चित्रा वाघ म्हणतात, “मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. कारण गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही!”

chitra wagh supriya sule meera bhayandar woman murder case
चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mira Road Murder Case Mumbai: बुधवारी रात्री मीरा-रोड भागामध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीने ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मनोज साने असं आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य आहे. आरोपीनं सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्यासाठी ते भाजले. काही तुकडे मिक्सरमधून काढले आणि बादलीत व पातेल्यात लपवून ठेवले. या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं असताना त्यावर आता भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं मीरा-रोड भागात?

मीरा-रोड परिसरामधील या प्रकारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आरोपी मनोज साने गेल्या तीन वर्षांपासून सरस्वती वैद्यसोबत लिव्ह-इनमध्ये राहात होता. मात्र, बुधवारी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडलं, तेव्हा आरोपीनं महिलेचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं.

लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही? मीरा-भाईंदर हत्या प्रकरणाला वेगळं वळण?

या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे”, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंच्या ट्वीटवर चित्रा वाघ यांचं ट्वीट!

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटनंतर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टॅग करून टीका करणारं ट्वीट केलं आहे. “सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल. किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो?” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

“तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्षं सापडली नाही. तेव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही ३५ तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच”, असंही वाघ यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

“मगरमच्छ के आंसू गाळण्याची गरज नाही”

दरम्यान, आरोपीला शिक्षा होईल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला आहे. “मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्ठ्या ताई…”, असं आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मीरा-रोड हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 14:33 IST
Next Story
धुळ्यातील रस्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या श्रेय वादात स्थानिकांना मनस्ताप