scorecardresearch

रोहित पवारांच्या भेटीनंतर नितीन गडकरींनी दिलं आश्वासन; म्हणाले…

नितीन गडकरी आणि रोहित पवार यांची ही भेट सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात आहे.

रोहित पवारांच्या भेटीनंतर नितीन गडकरींनी दिलं आश्वासन; म्हणाले…
मतदारसंघातील कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. करोना काळात १३ हजार कि.मी. रस्त्यांच्या निर्माणातून नवा विक्रम केल्याबद्दल रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांचं यावेळी अभिनंदन केलं आहे. त्याचसोबत, मतदारसंघातून जाणाऱ्या पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेल्या ११४ कि. मी. कामाकडे देखील यावेळी रोहित पवारांनी नितीन गडकरी यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रलंबित कामासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी, नितीन गडकरी यांनी रोहित पवारांना सहकार्याचं आश्वासन देखील दिलं आहे.

केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत काही निधी मतदारसंघासाठी मिळावा यासाठी देखील रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. अहमदनगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावं, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ चे ५१ किमी अंतराचं काम मागील वर्षी पूर्ण झालं आहे. मात्र, साबळखेड – आष्टी – चिंचपूर – जामखेड येथून २० किलोमीटरचा पॅच गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. ज्यावर वाहन चालवणं अशक्य आहे. त्यातच मराठवाडा व अहमदनगरला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे, याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं आहे.

नितीन गडकरींनी दिलं ‘हे’ आश्वासन

नितीन गडकरी आणि रोहित पवार यांची ही भेट सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात आहे. रस्त्यांच्या या कामासाठी पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन देखील यावेळी नितीन गडकरी यांनी आमदार रोहित पवार यांना दिलं आहे. आमदार रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये अनेक मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. यावेळी रोहित पवार यांनी मतदारसंघातील काही कामांसाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची देखील भेट घेतली आहे. तर काहीच दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची देखील भेट घेतली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या