खान्देश शिक्षण मंडळात सुमारे ५० लाख रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी २५ ऑक्टोबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेले महाविद्यालयीन शिक्षकांच्या ‘एमफुक्टो’ या संघटनेचे अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू प्रा. शिवाजी पाटील यांच्यासह तत्कालीन प्राचार्य एस. आर. चौधरी यांना मंगळवारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
२००१ ते २००९ या कालावधीत खान्देश शिक्षण मंडळाचे तत्कालीन सचिव प्रा. शिवाजी पाटील, तत्कालीन प्राचार्य एस. आर. चौधरी, तत्कालीन संचालक शशांक जोशी, विनोद पाटील, अजय केले, डॉ. संदेश गुजराथी यांसह आठ जणांनी संस्थेची अनामत रक्कम आणि परत देय रकमेत सुमारे ५० लाख रुपयांचा अपहार केल्याचे हे प्रकरण आहे. संस्थेत कार्यरत शिपाई चंद्रकांत बोरसे यांच्या नावावर २००२ ते २००४ या कालावधीत लाखो रूपयांच्या ठेवी ठेवण्यात आल्याचे संस्थेचे संचालक दिलीप जैन यांनी मिळविलेल्या माहितीत आढळून आले. त्यांनी २०१० मध्ये यासंदर्भात पोलीस व वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे जैन यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. २०११ मध्ये आठही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रा. शिवाजी पाटील व प्राचार्य चौधरी यांनी सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. फिर्यादी जैन यांनी उच्च न्यायालयात जामिनाला आव्हान दिले. ही याचिका मंजूर करीत उच्च न्यायालयाने प्रा. पाटील यांच्यासह आठही जणांचा जामीन रद्द केला. संशयितांना पंधरा दिवसात पोलिसांमध्ये हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार प्रा. पाटील व चौधरी सोमवारी पोलिसांना शरण गेले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक करून अमळनेर न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मगंळवारी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्या. बी. व्ही. बारावकर यांनी दोघांना १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.