नांदेड : वैद्यकीय शिक्षण आणि त्यातील वेगवेगळ्या विषयांशी संबंधित इंग्रजीतील पुस्तके मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे मत लेखक डॉ. रविन थत्ते यांनी येथे व्यक्त केल्यानंतर त्यांच्या या मनोदयाला संपूर्ण सहकार्य आणि आर्थिक पाठबळ देण्याची तयारी एमजीएम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी दर्शविली आहे.
नांदेडमध्ये अलीकडेच प्लास्टिक सर्जन परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील या विषयातल्या अनेक तज्ज्ञांसह २०० डॉक्टर्स येथे आले होते. परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात डॉ. थत्ते यांनी वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उपचारांशी संबंधित पुस्तके आणि ज्ञान इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याचे सांगून सर्वसामान्यांना हे ज्ञान मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याची गरज विशद केली.
मी स्वतः काही वैद्यकीय पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद केला असून त्यात आणखी काम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच या कामांतील आर्थिक बाबीलाही त्यांनी स्पर्श केला. त्यांच्यानंतर वैद्यकीय अभियांत्रिकी आणि इतर ज्ञानशाखांची महाविद्यालये चालविणाऱ्या कमलकिशोर कदम यांनी डॉ. थत्ते यांच्या सूचनेचे स्वागत करतानाच वैद्यकीय ज्ञान मातृभाषेत उपलब्ध होत असेल, तर त्यासाठी आर्थिक पाठबळ एमजीएमतर्फे देण्याची घोषणा केली.
डॉ. थत्ते यांना मराठी अनुवादासाठी जी पुस्तके योग्य आणि महत्त्वाची वाटतात, ती त्यांनी सुचवावीत. बाकी जबाबदारी आमची शिक्षणसंस्था घेईल, असे कदम यांनी वरील परिषदेतच स्पष्ट केले. नांदेडमधील प्लास्टिक सर्जन डॉ.संजय कदम हे डॉ.थत्ते यांचे विद्यार्थी असून कमलकिशोर कदम यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकल्पामध्ये समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या विषयी डॉ. थत्ते यांच्याशी पुन्हा चर्चा केली जाणार असून त्यानंतर पुढील रुपरेषा ठरेल, असे डॉ. कदम यांनी सांगितले. डॉ. थत्ते यांना नांदेडमध्ये वैद्यक अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थिनी भेटल्या. त्यांना शरीर क्रियाशास्त्रातील पुस्तक मराठीत उपलब्ध व्हावे, अशी सूचना मांडली.
डॉ. रविन थत्ते हे जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन म्हणून ओळखले जातात. मुंबईतील वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापन करून ते १९९७ साली निवृत्त झाले. पण प्लास्टिक सर्जरी या आपल्या आवडत्या विषयात ते आज ८६ व्या वर्षी कार्यरत आहेत. ज्ञानेश्वरीवर ६ पुस्तके लिहून त्यांनी ते इंग्रजीमध्ये अनुवादित केले. प्लास्टिक सर्जरीवरही त्यांचे मराठीमध्ये एक पुस्तक आहे. कमलकिशोर कदम यांनी नांदेडमध्ये केलेल्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले.