अलिबाग– मुख्यमंत्री समुध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायती मध्ये रोजगार हमीच्या कामांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मनरेगा अंतर्गत २० पेक्षा अधिक कामे मंजूरच होत नसल्याने, अभियानासाठी निवडण झालेल्या ग्रामपंचायतींची कोंडी झाली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांना ब्रेक लागला आहे. ३१ मार्च पर्यंत ही पोर्टल वरील तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी रोजगार हमी विभागाकडे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र/राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमानकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वेात्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.
या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध , स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे अभियानाचे मुख्य घटक असून अभियान कालावधीत झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकण करून ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. या पुरस्कारांमुळे पंचायतींना नवे प्रोत्साहन मिळेल, स्थानिक स्तरावर विकासात्मक योजनांची अंमलबजावणी सर्वंकष पद्धतीने होईल आणि एक निरोगी, स्पर्धात्मक परिसंस्था उभारली जाईल अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी सहा गुण मिळणार आहेत. मात्र योजने अतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामांना तांत्रिक अडचणींचा ब्रेक लागला आहे. नवीन कामे मंजुरच होत नसल्याने, पोर्टल वरून संकेतांक तयार होत नसल्याने, नवीन कामे सुरु करणे अशक्य झाले आहे. ग्रामंपाचायतीमध्ये २० पेक्षा अधिक कामांचे मस्टर निघण्यास, कामांचे वर्क कोड निघण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही तांत्रिक अडचण ३१ मार्च अखेरपर्यंत दूर करावी अशी मागणी रोजगार हमी विभागाकडे करण्यात आली आहे.
- जुनी रोजगार हमी योजना बंद करून जी राम जी नामक नवीन योजना पुढील वर्षापासून कार्यान्वित केली जाणार आहेत. त्यामुळे नविन कामे मंजुर करण्यावर निर्बंध आले आहेत. या दीड महिन्यात जुनी अपुर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविला जात आहे. -भरत बास्टेवाड, आयुक्त रोजगार हमी योजना

