तळीयेवासीयांची सरकारकडे मोठय़ा घरांची मागणी

तळीये गावातील कोंडाळकरवाडीसह इतर वाडीतील बाधितांसाठी २६१ घरे बांधली जाणार आहेत.

मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार महाड, तळीये गावातील दरडग्रस्तांना ‘प्री फॅब’ पद्धतीची ४०० चौ. फुटांची घरे बांधून देण्याची तयारी म्हाडाने के ली असली तरी तळीयेवासीयांनी मात्र ही घरे नाकारली आहेत. कोकणासाठी ही घरे योग्य नाहीत तसेच ती खूपच छोटी असल्याचे म्हणत ‘प्री फॅब’ऐवजी स्लॅबची थोडी मोठी, ७०० ते १००० चौ. फुटांची घरे देण्याची मागणी तळीयेवासीयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. तसे लेखी निवेदनही ग्रामस्थांकडून राज्य सरकारला देण्यात आले आहे.

तळीये गावातील कोंडाळकरवाडीसह इतर वाडीतील बाधितांसाठी २६१ घरे बांधली जाणार आहेत. गुजरात, भुजमधील एका कंपनीत ही घरे तयार केली जाणार असून या घरांचे दोन नमुने म्हाडा भवनात लावण्यात आले आहेत. पुढील आठवडय़ात तळीयेवासीयांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना ही घरे पाहण्यासाठी बोलावले जाणार आहे. त्यांच्या मागणीनुसार घरांच्या रचनेत थोडेफार बदल करत एका नमुन्याची निवड करण्यात येणार आहे. मात्र याआधीच काही बाधितांनी या घरांची पाहणी केली असून ही घरे पसंत नसल्याचे त्यांनी सांगितले.

गावी मोठी कुटुंबे असतात, शेतीची अवजारे, धान्य, गुरे असे सगळे काही असते. त्यामुळे छोटय़ा घरात गावातील कुटुंबे राहूच शकत नाहीत. त्यामुळे आमचा सहानुभूतिपूर्वक विचार करत आम्हाला मोठी आणि स्लॅबची घरे द्यावीत, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याची माहिती बाधितांपैकी एक नथुराम कोंडाळकर यांनी सांगितली.

महाड- पोलादपूर- माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ग्रामस्थांना ही घरे पसंत नसल्याचे सांगितले. गावातील घरे ही १०००, १५०० चौ. फुटांची असून अंगण, पडवी, ओटी अशा सगळ्या गोष्टी त्यात आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता लहान घरे नको असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिल्याची माहिती गोगावले यांनी दिली. गावकऱ्यांच्या मागणीनुसार ७०० ते १००० चौ. फुटांची  घरे द्यावीत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा भवनातील घरांच्या दोन नमुन्यांची पाहणी केली. लवकरच मुख्यमंत्रीही या घरांची पाहणी करतील असे त्यांनी या वेळी सांगितले. तर यात आवश्यकतेनुसार घरांच्या रचनेत काही बदल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mhada preparing to build 400 sq ft houses for taliye village affected by landslide zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या