अलिबाग- नगराध्यक्षपावर नियुक्ती होऊन चार दिवस उलटत नाही तर म्हसळा नगराध्यक्ष शाहीद जंजीरकर यांनी राजिनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे स्वखुशीने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना सादर केलेल्या राजीनाम्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर पदाचा राजीनामा देत असल्याचे जंजीरकर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांनी चार दिवसांतच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे शाहीद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसच्या मदतीने नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्तापित केले.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. जंजिरकर यांना ९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीला केवळ ६ मतांवर समाधान मानावे लागले होते. गेली दहा वर्ष ही नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सहभागी झाला होता. या पक्षांतराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत दाद मागितली होती.
त्यावर निर्णय देतांना जिल्हाधिकारी यांनी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात शिवसेनेनी नगर विकास मंत्र्यांकडे दाद मागितली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. दरम्यान याच पार्श्वभूमीवर गेल्या गुरुवारी नगराध्यक्षपदाची निवडणुक झाली होती. ज्यात शिवसेना शिंदे गटाचे जंजिरकर हे काँग्रेसच्या पाठींब्यावर नगराध्यक्ष झाले होते.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.
या निवडीनंतर नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे या संपुर्ण प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्याकडून जंजीरकर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार जंजीरकर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी नगरसेवक हरसल कादरी आणि नसीर मिठागरे त्यांच्या समवेत होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तो स्विकारला.
