अलिबाग : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे सुरू असलेल्या लाचखोरीला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठा धक्का दिला आहे. घर बांधण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात दोन लोकसेवकांना ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणात बबन लक्ष्मण कांबळे (वय ४४), कृषी अधिकारी, पंचायत समिती म्हसळा तसेच ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्दचे प्रशासक (वर्ग-२) आणि कोमल निवृत्ती रामनबैनवाड (वय २६), ग्रामपंचायत अधिकारी (वर्ग-३) यांना अटक घेण्यात आले आहे. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात या गुन्ह्यची नोंद करण्यात आली आहे.

मौजे सकलप (ता. म्हसळा) येथील सर्व्हे क्रमांक १५/२ या जागेवर घर बांधण्यासाठी ना-हरकत दाखला मिळविण्यासाठी जमीन मालक यांनी ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदाराकडे जमीन मालकाकडून संमतीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर आरोपी बबन कांबळे यांनी ५ हजार रुपये आणि कोमल रामनबैनवाड यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. नंतर तडजोडीनंतर प्रत्येकी ४ हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने एसीबी रायगड-अलिबाग कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट झाली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचण्यात आला. कोमल रामनबैनवाड यांनी तक्रारदाराकडून ४ हजार रुपये स्वीकारताच पंचासमक्ष त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर बबन कांबळे यांना पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, सुहास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.