म्हसवड : श्री सिध्दनाथ – जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न

या विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला होता.

म्हसवड येथील श्री सिध्दनाथ – जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुळशी विवाहाच्या दिवशी रात्री १२ वाजता सनई चौघडा मंगल वाद्यात पुरोहितांच्या मंत्रघोषात धार्मिक विधीपूर्वक पारंपारिक पध्दतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. 

या विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुळसी विवाहाच्या दिवशी म्हणजेच सोमवार (दि.१४)पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकारी कृष्णाजी गुरव यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे १२ दिवसांचे घट उठविण्यात आले.

या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर हत्तीवरील सुशोभित केलेल्या अंबारीवर सायंकाळी पाच वाजता श्री सिध्दनाथाची पंचधातूची उत्सव मुर्ती स्थानापन्न करण्यात आली. नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता.

दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील प्रांगणात या विवाह सोहळ्यानिमित्त गावोगावच्या भाविकांचा गजी- ढोलाचा कार्यक्रम अखंडपणे रात्री बारा पर्यंत सुरु ठेवला होता. हत्तीवरील श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात निमंत्रित करण्यात आले.

रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तीवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात विवाह समारंभास नेण्यात आली. श्रींची मूर्ती गाभाऱ्यात जाताच वधू देवी जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने, विधीपूर्वक, पुरोहित पिंटू पाठक, प्रज्योत पाठक आदींनी मंगलाष्टका म्हणून अक्षदाच्या उधळणीत श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री १२ वाजता थाटात संपन्न झाला. या विवाह सेहळ्यानिमित्त मंदीर कळस दिपमाळा, मुख्य प्रवेशद्वार आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभित करुन उजळण्यात आला होता. मंदिर परिसरात सनई-चौघडा, ढोल-ताशा, बँड, गजी झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजी सुरु होती. तसेच, या शाही विवाह सोहळ्या निमित्त आलेल्या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.

या विवाह सोहळ्यास येथील न्यायालयाचे न्यायाधीश कोल्हापुरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ गुरव, उपाध्यक्ष महेश गुरव,सर्व विश्वस्त, सचिव दिलीप कीर्तने, नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर, पृथ्वीराज व अजय, विजय राजेमाने, विलासराव माने यांच्यासह श्रींचेमानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पुरोहित, पुजारी मंडळी सह दुर गावातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mhaswad the royal wedding ceremony of shri siddhanath jogeshwari was held in thatta msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या