मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह राज्याच्या विविध भागांत दुधात भेसळ करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत केली.
मनिषा कायंदे, कृपाल तुमाने यांनी या बाबत प्रश्न उपस्थितीत केला होता. अनिल परब, सचिन आहीर, भाई जगताप, प्रवीण दरेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. दूध भेसळखोरांवर किरकोळ कारवाई करून सोडून दिले जाते. अधिकारी आणि भेसळखोरांचे लागेबांधे आहेत, त्यामुळे त्यांचे फावले आहे. भेसळखोरांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. दूध भेसळखोरांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमुखी मागणी करण्यात आली.
अन्न आणि औषध प्रशासन विभाग मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकून दूध भेसळीचा पर्दाफाश करीत असते. वर्सोवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवजित नगर, अंधेरी पूर्व मधील संत लुईस मार्ग, अशा एकूण सात ठिकाणी छापा टाकून दूध भेसळीची छडा लावला आहे. या ठिकाणी अमूल, गोकूळ या कंपन्याच्या दूधात भेसळ करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. सात जणांना अटक केली होती. पण, यापुढे दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती झिरवाळ यांनी दिली.
भेसळ रोखण्यासाठी पदभरती
मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागात अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही मंत्री झिरवाळ म्हणाले. सुगंधित सुपारीच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
