"साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप तिकडे...", शरद पवारांचं नाव घेत इम्तियाज जलील यांचा राजेश टोपेंना टोला! | mim imtiyaz jaleel slams rajesh tope ncp mocks sharad pawar | Loksatta

“साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप तिकडे…”, शरद पवारांचं नाव घेत इम्तियाज जलील यांचा राजेश टोपेंना टोला!

जलील म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मुस्लिमांची मतं घेत राहणार. मुस्लिमांना खूश करण्यासाठी महानगरपालिकेत एखादा नगरसेवक, जिल्हा परिषदेत एखादा सदस्य करायचा, पण …!”

imtiyaz jaleel sharad pawar
इम्तियाज जलील यांची शरद पवारांचं नाव घेत राजेश टोपेंवर टीका (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्यात एकीकडे पिंपरी आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांचीही चर्चा चालू आहे. एमआयएम महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी एमआयएमविषयी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा कलगीतुरा चालू झाल्याचं पाहायला मिळत आहे. इम्तियाज जलील जातीयवादी पक्षाचे खासदार असून आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, अशा आशयाचं विधान राजेश टोपेंनी केलं होतं. त्यावरून आता इम्तियाज जलील यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“…तर तुमची धर्मनिरपेक्षता मी मानली असती”

“मी राजेश टोपेंना एवढंच सांगेन की धर्मनिरपेक्षतेची तुमची व्याख्या आणि माझी व्याख्या यात फार मोठा फरक आहे. जर औरंगाबादमधून तुम्ही एखाद्या मुस्लीम उमेदवाराला खासदार म्हणून निवडून आणलं, तर तुमच्या धर्मनिरपेक्षतेला मी मानलं असतं. पण जर इम्तियाज जलील एमआयएम पक्षाकडून निवडून येतो आणि तुम्ही म्हणता की मी जातीयवादी आहे तर मग तुमच्या धर्मनिरपेक्षतेचा नेमका अर्थ काय आहे?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मुस्लिमांची मतं घेत राहणार. मुस्लिमांना खूश करण्यासाठी महानगरपालिकेत एखादा नगरसेवक, जिल्हा परिषदेत एखादा सदस्य करायचा, पण विधानसभा किंवा लोकसभेत तुम्हीच जायचं. साहेब, तुम्ही आणि तुमचे बाप लोकसभा आणि विधानसभेत वाटण्या करून घेणार आणि आम्ही तुम्हाला मतदान देत देत फक्त आमच्या गल्लीतले नेते बनून राहणार”, अशा शब्दांत जलील यांनी राजेश टोपेंच्या विधानावरून टीकास्र सोडलं आहे.

“ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला हे शोभणारं नाही”, ठाकरे गटानं विरोधकांना सुनावलं; म्हणे, “अशा वेळी…!”

“..तर ते दिवस गेले”

“मी मुस्लिमांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण केला आहे. मी कोणत्याही स्तरावर जाऊन त्यांना आव्हान देऊ शकतो. आता आम्हीही तुमच्या वरीष्ठांसोबत बसू शकतो. आता शरद पवारांच्या खाली मी बसणार नाही. मी त्यांच्या शेजारी बसण्याची ताकद ठेवतो. तुम्ही जर असं म्हणत असाल की राजेश टोपे खुर्चीवर बसणार आणि इम्तियाज जलील सतरंज्या उचलणार, तर ते दिवस गेले. आता तुम्हालाही सतरंज्या उचलाव्या लागतील अशी वेळ मी आणेन”, असा इशाराच इम्तियाज जलील यांनी राजेश टोपेंना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:56 IST
Next Story
व्यावसायीकरणामुळे झाडीपट्टी रंगभूमीचा आत्माच हरवला, पद्मश्री परशुराम खुणे यांची खंत