मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (१ ऑक्टोबर) राज्याच्या वन्यजीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या खात्याशी संबंधित काही गोष्टींबाबत मोठं समाधान व्यक्त केलं आहे. “कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल की स्वतः मुख्यमंत्र्यांकडेच राज्याच्या वन विभागाची जबाबदारी आहे. त्यांनाही या विषयाची तेवढीच आवड आहे. त्यामुळे, राज्याच्या वन विभागाचं वजन वाढलं आहे.”

“आम्ही आधीच्या काही बैठकामध्ये बघायचो की ठरलेली महत्त्वाची खाती आली की, त्यांच्यासमोर वन खातं किंवा पर्यावरण खातं बोलू शकतंय की नाही असं वाटायचं. चुकतंय दिसत असायचं. पण त्याबाबत किती बोलू शकतो? असा प्रश्न होता. पण आताची परिस्थिती पाहिली तर आता ह्यात समतोल साधला जात आहे. चुकीच्या वाटणाऱ्या विषयांवर बोललं जात आहे. हे असं पहिल्यांदाच होत आहे आणि हेच बघून मला आनंद होत आहे. राज्यात शाश्वत विकास हवा असेल तर हे आवश्यक आहे तसंच आता होत आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

लहानपणापासूनच आमच्यासाठी हा विषय जवळचा!

“आमच्या घरी सर्वांच्या आवडीचे विषय वेगवेगळे आहेत. माझा भाऊ म्हणजेच तेजसचा कल वनाशीसंबंधित विषयांकडे जास्त आहे. तर मी वातावरणातील बदल आणि पर्यावरण या विषयांकडे अधिक लक्ष देऊन असतो. आमचे वडील हे दोन्हीकडे बॅलन्स करत असतात. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की, जंगलाशी संबंधित विषयांची आवड ही आमच्या सर्वांमध्येच सुरुवातीपासून आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांना देखील या विषयांची प्रचंड आवड होती. त्यामुळे, लहानपणापासूनच आमच्यासाठी हा विषय जवळचा आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

वटवृक्षाचं पूजन करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वन्य जीव सप्ताह २०२१ चा शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात होत असलेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधानसचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्य जीव प्रेमी उपस्थित होते. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दुरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते.