राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या रोखठोक आणि स्पष्ट स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतात. कोणत्याही विषयाबाबत बच्चू कडू यांची स्पष्ट मतं आणि त्यांची वक्तव्य नेहमीच राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरतात. त्यांचा असाच एक नवीन व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये बच्चू कडू एका प्रशासकीय अधिकाऱ्याची खरडपट्टी काढत आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची तंबीच भरली आहे.

नेमकं झालं काय?

बच्चू कडूंनी आज भुसावळमधील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने गोरगरीबांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी विचारणा केली. मात्र, त्यासंदर्भात अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचं समजताच बच्चू कडूंचा पारा चढला आणि त्यांनी तिथल्या तिथेच संबंधित अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.

रमाई योजनेवरून घेतलं अधिकाऱ्यांना फैलावर!

राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून बच्चू कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी चांगलंच फैलावर घेतलं. “फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला लाथच मारायला पाहिजे. लाज वाटली पाहिजे थोडी. किमान ३५ हजारापैकी १० हजाराचं तर काम करा. रोजगार हमी सांगतो, नालायका. गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला. तो मेला तरी चालेल. नको होऊ दे १० वर्ष घर. तुमची काहीच तयारी नाही. कोणत्या वर्षात योजना सुरू केली तुम्ही?” अशा शब्दांत बच्चू कडू अधिकाऱ्याला झापत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसून येत आहे.

“तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे”

“रमाईमध्ये सरकार टार्गेट पूर्ण करू शकत नाहीये. आपण प्रस्ताव पाठवत नाही. रमाईचे प्रस्ताव वेगळे काढा. एससी लोकांसाठी रमाई योजना आहे. त्याच्यासाठी वेगळे अर्ज मागवा. ते लगेच मंजूर होतं. केंद्राकडे जायची गरज नाही. दोन दिवसांत कर्ज पाठवलं, जिल्ह्याला पाठवलं की मंजूरी मिळते. तुमच्यावर तर अॅट्रॉसिटी दाखल करायला पाहिजे. त्या दलितांवर अन्याय का करत आहात तुम्ही? समाज कल्याणचं कोण पाहातं? माहिती नाही? रमाई योजनेसाठी आपण टेबलच ठेवला नाही का?”, अशी प्रश्नांची सरबत्तीच बच्चू कडूंनी सुरू केली.

भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी हात कलम करून घ्यायलाही तयार आहे – बच्चू कडू

“…हे तुमचं अज्ञान आहे”

“रमाईच्या घरकुलासाठी डीपीआर वगैरे लागत नाही. हे तुमचं अज्ञान आहे. रमाईची योजना राबवताना त्याच्या नावाने पीआर कार्ड आणि जातीचा दाखला असला पाहिजे. त्याच्या नावाने अर्ज भरून घेतला पाहिजे. आपण मागणी केली पाहिजे. रमाई योजना सगळ्यात सोपी आहे. डीपीआर वगैरे कुठे चाललाय तुम्ही? मला किमान या महिन्यात रमाईचे प्रस्ताव पाठवा”, असं बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना यावेळी बजावलं.

दरम्यान, यावेळी बच्चू कडूंनी कामचुकार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना केल्या आहेत.